विजयनगर परिसरात वाहतूक ठप्प
सांडपाण्याची समस्या सुटली ः खोदकामामुळे कोंडी तीव्र
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : विजयनगर नाका परिसरात ड्रेनेज लाइन फुटल्याने काही दिवसांपूर्वी सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, अडचणींवर मात करत मलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण केली आहे, मात्र खोदलेले खड्डे भरले असले तरी रस्ता समतल नसल्याने वाहनांची गती धीमी होऊन कोंडी होत आहे.
विजयनगर नाका परिसरात ड्रेनेज लाइनमधून सांडपाणी लिकेज होत असल्याने काही दिवसांपूर्वी मुख्य पूना लिंक रस्त्यावर सांडपाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. तक्रारीनंतर महानगरपालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, मागील आठवड्यात रात्रीच्या वेळी खोदकाम करून मलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. याच भागातून जलवाहिनी गेल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला होता. अखेर तांत्रिक अडचणींवर मात करत हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर खोदलेला खड्डा भरण्याचे काम करण्यात आले असले, तरी हा भाग तीन रस्त्यांच्या संगमावर असल्याने गर्दीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
शहाड पुलाचे काम सुरू असल्याने अनेक वाहने, एसटी बसेस, शाळेच्या बस आणि रुग्णवाहिका पूना लिंक रोडहून वळविल्या गेल्या आहेत. त्यामुळे विजयनगर परिसरातील खोदकामामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत.
वाहनांची कोंडी
विजयनगर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची खऱ्या अर्थाने कोंडी झाली असून, त्यांना गर्दीच्या वेळी परिसरातून मुख्य रस्त्यावर बाहेर पडताना वाहतूक कोंडीचा सतत सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात आमराईकडून चिंचपाडा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कलव्हर्टच्या कामकाजामुळेही महिनाभर त्रास सहन करावा लागला होता. तो मार्ग खुला होताच आता दुसऱ्या बाजूने पूना लिंक रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याने विजयनगरमधील रहिवासी विशेषतः चारचाकी चालक त्रस्त आहेत. लवकरात लवकर डांबरीकरण होऊन रस्ता पूर्णपणे मोकळा होण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत.
डांबरीकरण होणार
ड्रेनेजच्या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी ही कामे करण्यात आली आहेत. खोदकामाशिवाय लिकेज बुजवणे शक्य नाही. आता या परिसरातून वाहतूक सुरू असून, काही दिवसांतच डांबरीकरण होणार आहे. तोवर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत केले जात आहे, तर येत्या काही दिवसांत काटेमानिवलीपासून रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात येणार असून, विजयनगर चौक परिसरातही डांबरीकरण करून रस्ता समतल केला जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दिली आहे.