तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. त्यावेळी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेला चेहरा म्हणजे शितल म्हात्रे. दहीसर विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 8 च्या त्या नगरसेविका होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2 डिसेंबरला नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. शितल म्हात्रे यांचा नगरसेविका म्हणून काम करण्याचा अनुभव लक्षात घेता त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल असं बोललं जातय. पण शितल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का? हा मुख्य मुद्दा आहे.
शितल म्हात्रे यांनी दहीसरच्या वॉर्ड क्रमांक 8 मधून 2012 साली पहिल्यांदा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली. त्या आधी त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी होत्या. शीतल म्हात्रे यांनी दोनवेळा नगरसेविका म्हणून काम केलं. आताही त्यांना महापालिका निवडणुकीसाठी दहीसरमधून तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. पण शीतल म्हात्रे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीयत. शितल म्हात्रे यांनी पक्ष श्रेष्ठीला आपली भूमिका कळवली आहे. वॉर्ड क्रमांक 7 मधून पक्ष ज्याला तिकीट देणार, त्याच्यासाठी काम करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.
शितल म्हात्रे यांचं नाव वादात सापडलेलं
शितल म्हात्रे नगरसेवकपदाची निवडणूक न लढवण्यावर ठाम आहेत. शितल म्हात्रे आमदारकीसाठी इच्छूक आहेत. पक्षाने तसा विचार करावा अस मत त्यांनी मांडलं. शितल म्हात्रे या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. दोनवेळा त्या प्रभाग समिती अध्यक्ष राहिल्या आहेत. एक आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड पुकारलं होतं. तेव्हा सुरुवातीला शितल म्हात्रे यांनी त्या विरोधात आंदोलन केलं होतं. पण नंतर लगेच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्या. मध्यंतरी शितल म्हात्रे यांचं नाव वादातही सापडलं होतं. महायुतीला यावेळी काहीही करुन महापालिकेची निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे.