डोंबिवली पश्चिमेतील पाईपलाईन गॅस प्रकल्पाला गती
esakal November 13, 2025 01:45 PM

डोंबिवली पश्चिमेतील पाइपलाइन गॅस प्रकल्पाला गती
महानगर गॅस कंपनीसोबत प्रगतीचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ ः डोंबिवली पश्चिमेतील पाइपलाइन गॅसपुरवठा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये गती आणण्यासाठी महानगर गॅस कंपनीसोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत डोंबिवलीतील प्रकल्पांची सद्यःस्थिती, प्रलंबित परवानग्या आणि आगामी कामांची आखणी यावर चर्चा झाली. महानगर गॅस कंपनीचे डोंबिवली विभागाचे असिस्टंट मॅनेजर उमेश अरोटे या बैठकीस उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षापासून पश्चिम डोंबिवलीतील अनेक सोसायट्या आणि इमारतींमध्ये पाइपलाइनचे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क टाकण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्ष गॅसपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी होती. प्रकल्पाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत महानगर गॅस कंपनीने काही प्रभागांमध्ये गॅसपुरवठा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली. जुन्या विष्णूनगर पोलिस ठाण्यात नाला क्रॉस करून गॅस लाइन टाकण्याच्या कामासाठी पालिकेच्या सहकार्याची गरज असून, हे कार्य अडथळ्याविना पूर्ण करण्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार आणि मागणी महानगर गॅस कंपनीकडे करण्यात आली आहे. दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना सुरक्षित, सातत्यपूर्ण आणि अखंड पाइपलाइन गॅसपुरवठा उपलब्ध करणे हा प्राथमिक उद्देश असून, प्रशासकीय आणि तांत्रिक सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण केल्या जात आहेत, असे बैठकीनंतर माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. यामुळे डोंबिवलीत गॅस पाइपलाइन प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा असून, नागरिकांच्या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम लागणार असल्याची शक्यता आहे.

परवानग्या अद्यापही प्रलंबित
तथापि, काही प्रमुख ठिकाणी रस्ता खोदकामासाठी आवश्यक असलेल्या पालिकेच्या परवानग्या अद्याप प्रलंबित असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडील परवानग्या त्वरित मिळाव्यात यासाठी संबंधितांनी स्वतः शहर अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, परवानग्या लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.