राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही, मात्र नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच राज्यात महापालिका निवडणुका देखील लागू शकतात असा अंदाज आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. यावेळी अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जाणार आहेत, त्यामुळे पक्षांतराला देखील वेग आल्याचं पहायला मिळत आहे, इच्छूक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत.
दरम्यान आता नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात मालेगावामध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे. बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक आणि गेल्या वेळी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवलेले नेते बंडूकाका बच्छाव हे भाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. बंडू काका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जर बंडूकाका बच्छाव यांनी भाजपात प्रवेश केला तर हा शिवसेना शिंदे गटासाठी धक्का असणार आहे, कारण बंडू काका हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भूसे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली नाही तर बंडू काका बच्छाव यांच्या रुपानं शिवसेना शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी ते मालेगाव विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मत मिळवण्यात दुसऱ्या क्रमांकावर होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बंडूकाका बच्छाव यांनी देखील आपल्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिला आहे, त्यामुळे या मतदारसंघात युती न झाल्यास आता शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यात आहे. डॉ.तुषार शेवाळे, प्रसाद हिरेनंतर आता बंडू काका बच्छाव यांनी देखील भाजपात प्रवेश केला तर या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे.