बिहारचा निकाल लागताच भाजपाच्या बड्या नेत्याला दणका, थेट हकालपट्टीच्या आदेशाने खळबळ!
Tv9 Marathi November 15, 2025 09:45 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. भाजपला 89 तर जेडीयूने 85 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच इतर घटक पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. या विजयानंतर भाजपने आपल्या एका बड्या नेत्यावर मोठी कारवाई केली आहे. एका बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. हो नेता कोण आहे आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माजी मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी

बिहारमधील विजयानंतर भाजपने ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्यावर कडक कारवाई केली असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आर के सिंह यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना एका आढवड्यात उत्तर देण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. आर के सिंह यांच्यासह विधान परिषदेचे आमदार अशोक कुमार अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी केली आहे.

आरके सिंह यांच्यावर कारवाई

आर के सिंह हे बिहारमधील ज्येष्ठ नेते असून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आणि माजी केंद्रीय गृहसचिव म्हणून काम केलेले आहे. सिंह यांनी अनेकदा भ्रष्टाचार आणि गटबाजीचा आरोप करत एनडीए नेत्यांवर टीका केली होती. तसेच बिहार निवडणुकीदरम्यान मोकामा येथे झालेल्या हिंसाचाराला प्रशासन आणि निवडणूक आयोगाला जबाबदार धरले होते. तसेच त्यांनी सरकारवर 60 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देखील केला होता, त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

अग्रवाल कुटुंबावरही कारवाई

भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत विधान परिषदेचे आमदार अशोक कुमार अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी, कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. अशोक अग्रवाल यांनी आपल्या मुलाला कटिहारमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, त्यामुळे पक्षाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना एका आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.