आयपीएल 2026 मिनी लिलावात बोली लावण्यासाठी फ्रेंचायझीकडे किती पैसे शिल्लक? जाणून घ्या
GH News November 15, 2025 10:10 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची रणधुमाळी रिटेन्शन यादी जाहीर होताच सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यात फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करण्यासाठी प्रयत्नशील होते. काही फ्रेंचायझींना यात यशही आलं. आता सर्वच आयपीएलमधील संघांनी रिलीज केलेल्या आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे फ्रेंचायझी किती रकमेसह मिनी लिलावात उतरणार हा प्रश्न आहे. आयपीएल फ्रेंचायझींना 120 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. यासाठी कोणत्या खेळाडूवर काय बोली लावायची आणि पैसे कसे वाचावयचे हे फ्रेंचायझीवर अवलंबून आहे. आता मिनी लिलाव असल्याने फ्रेंचायझींना जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मुभा आहे. त्यामुळे रिटेन केलेले आणि ट्रेड केलेल्या खेळाडूंसाठी मोजलेली रक्कम पाहता कोणत्या फ्रेंचायझीकडे जास्त रक्कम शिल्लक आहे ते जाणून घेऊयात.

सर्वाधिक पैसे कोणाकडे?

कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वाधिक रक्कम आहे. त्यांच्या पर्समध्ये 64.3 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडे सर्वाधिक रक्कम आहे. 9 खेळाडूंना रिलीज केल्यानंतर चेन्नईच्या पर्समध्ये 43.4 कोटी आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या पर्समध्ये 25.5 कोटी शिल्लक आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सकडे मिनी लिलावात बोली लावण्यासाठी 21.18 कोटींची रक्कम आहे. लखनौ सुपर जायंट्सकडे 22.95 कोटी आहेत. रवींद्र जडेजाला संघात घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सकडे किती पैसे शिल्लक राहतील याची उत्सुकता होती. त्यांच्या पर्समध्ये 16.05 कोटी रुपये आहेत.

सर्वात कमी रक्कम कोणाकडे?

मागच्या पर्वात आरसीबीने जेतेपद मिळवलं होतं. पण यावेळी आरसीबीने 9 खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पर्समध्ये 16.4 कोटी रुपये आहेत. आरसीबीनंतर गुजरात टायटन्सकडे 12.9 कोटी, तर मागच्या पर्वात जेतेपदाने हुलकावणी घातलेल्या पंजाब किंग्सकडे 11.5 कोटी आहेत. तर सर्वात कमी रक्कम ही मुंबई इंडियन्सच्या खात्यात आहे. मुंबई इंडियन्सकडे मिनी लिलावात खर्च करण्यासाठी फक्त 2.75 कोटी आहेत. आता शिल्लक असलेल्या पैशातच काय ती बोली फ्रेंचायझींना लावावी लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळाडूंसाठी जोरदार रस्सीखेच होणार यात मात्र शंका नाही. कारण या दोन फ्रेंचायझींकडे सर्वाधिक पैसा आहे. आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मिनी लिलाव प्रक्रिया 16 डिसेंबर रोजी दुबईत पार पडणार आहे. एका दिवसात हा लिलाव होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.