पिरंगुटमधील दवाखान्यास हक्काच्या जागेची प्रतीक्षा
esakal November 16, 2025 02:45 AM

धोंडिबा कुंभार : सकाळ वृत्तसेवा
पिरंगुट, ता. १४ : पिरंगुट (ता.मुळशी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास स्वतःची हक्काची जागा नाही. तसेच कर्मचारी निवासही नाही. नळ जोड नसल्याने पाण्याची सुविधा नाही. जागेअभावी उपचारासाठी आलेल्या जनावरांना बांधायची अडचण निर्माण झाली आहे. सध्या दवाखाना सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या गोदामाच्या जागेत सुरू आहे.

श्वानासारखे प्राणी उपचारासाठी आले तर त्यांचा बंदोबस्त करणे अवघड जाते. सध्याच्या उपलब्ध जागेत चहूबाजूंनी रहिवासी आहेत. त्यात लहान मुलांचा मोठा समावेश आहे. मुलांना श्वान दंशाचा धोका आहे. त्यामुळे या दवाखाण्याच्या इमारतीला स्वतः ची जागा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हक्काची व कायदेशीर जागा नसल्याने इमारतही उभारता येत नाही. प्रयोगशाळेअभावी जवानरांचे रक्ताचे नमुने तसेच अन्य नमुने तपासणीसाठी औंध येथे जावे लागते, असे पशुपालक सुजित मते यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मात्र या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपली सेवा उत्तम प्रकारे देत आहेत. उपलब्ध जागेतील दवाखान्याच्या खोल्यांची तसेच इमारती भोवतालची वापरायच्या जागेत स्वच्छता ठेवली जात आहे. यापूर्वी या इमारतीसमोर पावसाळ्यात पाणी साचत होते. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन तिथे मुरूम टाकला आहे. त्यामुळे आता पाणी साचत नाही.

डॅा. शैलजा खोब्रागडे या पशुधन विकास अधिकारी वर्ग एक या पदावर कार्यरत आहेत. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून डॅा. प्रवीण पाटील काम पाहत आहेत. तसेच गोरख गरुड हे परिचर म्हणून काम पाहतात. दवाखान्यात रिक्त पदे नाहीत.

यांची आहे गरज
- प्रयोगशाळा
- क्ष किरण यंत्रणा
- कामकाजासाठी प्रशस्त खोल्या

एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या.......४५०
वंध्यत्व निर्मूलन संख्या.......१०१

लसीकरण
लाळ्या खुरकूत.......२२००
लंपी.......२०००
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी) - .......४१२
रेबीज.......३५२

परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
लंपी
थायलेरिया


वैरण बियाणे वितरण - मका, ज्वारी (६५० किलो ग्रॅम)
वार्षिक चारा प्रतिहेक्टर (टनांत)
हिरवा चारा...........६० ते ७०
वाळलेला चारा...........१५००


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदामाच्या उपलब्ध खोल्यांत पशुवैद्यकीय विभागाचे काम सुरू आहे. हक्काची जागा आणि इमारत उपलब्ध झाली तर पशुपालकांच्या म्हशी, गायी तसेच अन्य जनावरांना बांधण्यासाठी त्याचा लाभ होईल. श्वानांसाठी चांगली सोय होईल.
- डॅा. शैलजा खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी

पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी आमच्याकडे वेळेत येऊन जनावरांवर उपचार करतात. त्यामुळे आजपर्यंत चांगली सेवा मिळाली
आहे. मात्र, येथे जनावरांचे रक्त तपासणीसाठी तसेच क्ष किरण तपासणीसाठी सोय नसल्याने औंध येथे जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी दवाखान्यासाठी स्वतंत्र किमान पाच गुंठे जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्या जागेत इमारत झाल्यावर प्रयोगशाळा तसेच जनावरांना थांबण्यासाठी जागा मिळेल.
- बबन गोळे, पशुपालक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.