पुणे - ‘आकाशातल्या ग्रहांमध्ये दडलयं काय?’, ‘तारे कसे चमकतात?’, ‘अवकाशात नेमकं काय-काय आहे?’ या आणि अशा अनेक अवकाशातील रहस्यांबद्दल मनात अफाट कुतूहल घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी शनिवारी पहाटे मुंबईतून अमेरिकेच्या ‘नासा’ दौऱ्यासाठी रवाना झाले.
ज्यांच्याबद्दल केवळ पुस्तकात वाचले, ध्वनिचित्रफितीत पाहिले आणि ऐकले, ते ‘नासा’ आता डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार असल्याने या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
‘आतापर्यंत केवळ ‘नासा’बद्दल ऐकलं होतं, आता चक्क तिथे जाऊन पाहता येणार आहे, शक्य झाल्यास शास्त्रज्ञांना भेटा येणार आहे,’ अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी ‘नासा’ भेटीची उत्कंठा व्यक्त केली. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रामीण भागातील २५ गुणवंत विद्यार्थ्यांनी अमेरिकेत १० दिवसांच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी शनिवारी गगनभरारी घेतली.
हे विद्यार्थी शनिवारी पहाटे पाच वाजता मुंबईतून अमेरिकेसाठी (वॉशिग्टन डी सी) गेले आहेत. त्याचा हा प्रवास मुंबई-अबुधाबी- वॉशिग्टन डी सी असा असणार आहे. वॉशिग्टन डि सी येथे पोचल्यानंतर या शहराचा दौरा करून ते सोमवारी (ता. १७) ‘नासा’त जाणार आहेत.
त्यानंतर केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, कॅलिफोर्निया सेंटर, सिलिकॉन व्हॅली यांसह गुगल आणि ॲपल कंपन्यांचा व्हिजीटर कॅम्पस येथे हे विद्यार्थी भेट देणार आहेत. हे विद्यार्थी १४ दिवसांचा प्रवास करून २८ नोव्हेंबरला बंगळूरमध्ये पोचणार आहेत.
विद्यार्थ्यांसमवेत आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीशास्त्र केंद्राचे (आयुका) शास्त्रज्ञ समीर धुरडे, शिक्षिका माया लंघे (लोणीकंद), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) हे या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
‘नासा दौऱ्यासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर खूप आनंद झाला. अवकाशातील कुतूहलाबाबत मनात असणारे प्रश्न ‘नासा’मध्ये भेटीसाठी गेल्यावर तेथील शास्त्रज्ञांना विचारणार आहे. काही अवकाश मोहिमा अयशस्वी का होतात?, हे देखील विचारायचे आहे.’
- शुभ्रा रेणुसे, जिल्हा परिषद शाळा (पाबे), राजगड
‘नासाच्या दौऱ्यासाठी निवड झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. भविष्यात या दौऱ्याचा खूप फायदा होणार आहे. ‘नासा’ला भेटीमुळे खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत.’
- मोहम्मद उमर समीर शेख, जिल्हा परिषद शाळा (शहा), इंदापूर