अवतीभवती- 200 वर्षे जुनी प्रतिमा पूजनाची परंपरा
Marathi November 16, 2025 08:25 AM

>> अभय मिरजकर

मंदिर, मठ अशा धार्मिक संस्थानांमध्ये वर्षानुवर्षे रूढी, परंपरांचे पालन आणि परंपरा जतन करण्याचे काम केले जाते. परंतु एखाद्या कुटुंबात अशी परंपरा जतन करण्याचे कार्य दुर्मिळच असेल. लातूर येथे अशीच तब्बल 200 वर्षांपासून प्रतिमा पूजनाची परंपरा पाळली जात आहे.

मूळ लोहारा येथील संदीकर कुटुंब अनेक वर्षांपासून लातूर येथे स्थायिक आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ मनोहराचार्य संदीकर तिरुपती बालाजी येथून यांनी श्री व्यंकटेश, श्री देवी (लक्ष्मी) भुदेवी (पद्मावती) यांच्या प्रतिमा अगदी शास्त्राsक्त पद्धतीने तयार करून आणलेल्या. त्याचप्रमाणे गंडकी नदीच्या उगमाच्या ठिकाणावरून विविध प्रकारचे शाळीग्राम आणले. या प्रतिमांची आजही उत्तराधीमठाच्या पद्धतीप्रमाणे पूजा करण्यात येते. पूर्वी वाहत्या पाण्यात स्नान करूनच या प्रतिमांची पूजा केली जायची, पण लातूर येथे आल्यानंतर विहिरीच्या पाण्याने स्नान करून पूजा केली जाते. दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, नवरात्रोत्सव, बालाजीचे पारणे, चंपाषष्ठी उत्सव आणि आषाढी-कार्तिकी एकादशी या सणांच्या दिवशी या परंपरा पाळल्याच जातात.  या प्रतिमापूजनास पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो.

या देवघरात विष्णूपाद प्रतिमेवर भगवान श्री व्यंकटेश त्यांच्या उजव्या हाताला श्रीदेवी (लक्ष्मी) डाव्या हाताला भुदेवी (पद्मावती) आणि समोर कालिया मर्दन रूपातील श्रीकृष्ण व वेद व्यास यांच्या प्रतिमा आहेत, ज्यांची अगोदर पूजा केली जाते. मूळ प्रतिमेच्या पूजनानंतर विष्णू संनिधान पूजा, सर्व प्रकारच्या शाळीग्राम पूजा व नंतर देवघरातील श्री लक्ष्मीचा टाक, वायुदेव, गरुड, शेष, वृंदावनाची पूजा, नैवेद्य, आरती करून पूजा पूर्ण केली जाते. हा सर्व पूजाविधी एका ाढमाने करावयाचा असतो. नैवेद्यासाठी फक्त कोळशांची शेगडी वापरून नैवेद्य बनवला जातो.

मनोहराचार्य संदीकर यांच्यानंतर वामनाचार्य यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यांची विद्वत्ता एवढी होती की, त्याकाळी वामनाचार्यांचे लोहारा अशी गावची ओळख सांगितली जात असे. पुढे लातूर येथे स्थलांतरित झाल्यावर जनार्धनाचार्य संदीकर, हणमंताचार्य संदीकर, व्यंकटेशाचार्य संदीकर आणि आज सहाव्या पिढीतील अॅड. गुरुराज संदीकर ही परंपरा भक्तीने व श्रद्धेने पुढे चालवत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.