जीवापाड जपलेल्या द्राक्षबागांवर कुऱ्हाड
esakal November 16, 2025 10:45 AM

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. १५: जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतीला अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. निर्यातक्षम जम्बो द्राक्ष उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतीला घरघर लागली आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून जीवापाड जपलेल्या द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सलग दुसऱ्या वर्षी छाटणीनंतर घड निर्मिती न झाल्याने मागील महिनाभरात तालुक्यातील सुमारे चारशे एकर द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी तोडून भुईसपाट केल्या आहेत. द्राक्ष बागा तोडण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. यामुळे यावर्षी द्राक्ष निर्यातीत मोठी घट होणार असून याचा फटका तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना बसणार आहे.

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी, नारायणगाव, वारूळवाडी, येडगाव, मांजरवाडी, राजुरी, गोळेगाव या भागात सुमारे साडे तीन हजार एकर क्षेत्रात जम्बो, किंगबेरी, रेड ग्लोब, तास ए गणेश, थॉमसन सीडलेस, क्रिमसन आदी निर्यातक्षम जातीच्या द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जिवापाड मेहनत करून जोपासल्या आहेत.

द्राक्ष निर्यातीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने मागील काही वर्षात कृषी, अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले तरुण शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळले आहेत. बाग उभारणी, ठिबक सिंचन, मशागत व फवारणीसाठी ट्रॅक्टर, ब्लोअर खरेदी आदीसाठी शेतकऱ्यांनी एकरी आठ ते नऊ लाख रुपयांचा भांडवली खर्च केला आहे. काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ घेऊन शीतगृहाची उभारणी केली आहे. द्राक्ष बागांचा वाढलेला भांडवली खर्च, मागील तीन ते चार वर्षात झालेला हवामान बदल, खते, औषधे, मजुरी आदींचा वाढलेला भांडवली खर्च, गारपीट अतिवृष्टीचे सततचे अस्मानी संकट यामुळे अपेक्षित निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेता आले नाही. यामुळे सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे.

तालुक्यात द्राक्षबागे खाली सर्वाधिक ७०० एकर क्षेत्र गुंजाळवाडी परिसरात आहे. या पैकी मागील महिनाभरात शंभर एकर क्षेत्रातील द्राक्ष बागा तोडल्या गेले आहेत. नारायणगाव, वारूळवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव, मांजरवाडी, येडगाव, राजुरी परिसरातील सुमारे दीडशे एकर, गोळेगाव भागातील चाळीस एकर द्राक्ष बागा मागील महिनाभरात तोडल्या गेल्या आहेत.

या शेतकऱ्यांनी तोडल्या बागा
प्रकाश वाघ, तुकाराम ताम्हाणे, श्रीकांत वायकर, संतोष शिंदे, राहुल वायकर, सचिन ढवळे, गिरीश ढवळे, विलास वायकर, निखिल वायकर, आशिष तोडकर, धनजंय ढवळे, राजेश ढवळे, रोहन पाटे, विलास पाटे, नामदेव तोडकरी, जितेंद्र भोर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जम्बो द्राक्ष बागा तोडल्या आहेत.

मे महिन्यात ३४० मिलीमीटर पाऊस झाला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसला. यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक पुन्हा उभा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने द्राक्ष उत्पादकांसाठी विशेष मदत जाहीर करावी. जुन्या कर्जावरील व्याज माफ करावे. बागांचे संगोपन करण्यासाठी अल्प व्याजदरात पतपुरवठा करावा.
- राहुल बनकर, द्राक्ष बागायतदार

द्राक्ष बागेखाली शंभर एकर क्षेत्र आहे. यापैकी ७५ एकर क्षेत्रात घड निर्मिती झाली नाही. २५ एकर क्षेत्रातील द्राक्ष बागा तोडणीचे काम सुरू केले आहे. मागील ४० वर्षात प्रथमच द्राक्ष उत्पादकांवर संकट कोसळले आहे.
- प्रकाश वाघ, द्राक्ष उत्पादक
07477

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.