दगड वाहतूक, वाळू उपशाकडे दुर्लक्ष
अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी ; जयगड ग्रामस्थांचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः तालुक्यातील जयगडमधील महसूल विभागातील दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी करणारे निवेदन जयगड ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून बदलीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जयगड गावातील जेएसडब्लू प्रकल्पासाठी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात माती व काळ्या दगडाची वाहतूक केली जात आहे. या दगडाचा वापर जयगड खाडीत भराव करण्यासाठी केला जात आहे. तसेच खाडीमधून यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. या सर्व बेकायदेशीर कारभाराबाबत ग्रामस्थांनी तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. २ नोव्हेंबरला मंडळ अधिकारी यांना पंचनामा करावा, असे लेखी पत्र दिले होते; परंतु त्या पत्रावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही तसेच वारसतपास किंवा जमिनीशी संबंधित कोणतेही काम जाणीवपूर्वक टाळले जाते, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, महसूल विभागातील संबंधित अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून बदलीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्ष कोकण विभागाच्या महिला अध्यक्ष काजल नाईक, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, प्रहार जनशक्ती पक्ष रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सुर्वे, प्रहार जनशक्ती पक्ष रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष आदेश खाडे, रोहन सुर्वे, जयगड ग्रामस्थ सत्यविजय खाडे, सागर सुर्वे, जुईली सुर्वे आदी उपस्थित होते.
---