Crime News: निवडणुकीच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलिसही चक्रावले; कारवाईत एकाला अटक!
esakal November 17, 2025 09:45 AM

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होत असतानाच डोंबिवलीतील 27 गावांच्या हद्दीत शस्त्रांचा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने देसलेपाडा भागात टाकलेल्या धाडीत पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार, सुरा, खंजीर, चाकू असा मोठ्या प्रमाणावर बेकायदा शस्त्रसाठा हस्तगत केला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या साठ्याने पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.

देसलेपाड्यातील गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या रोशन हिरानंद झा (वय 36) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत साधारण सव्वा दोन लाख इतकी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाईकरण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा- 3 च्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही धाड टाकली.

पानांचा रंग बदलण्याची वैज्ञानिक प्रक्रिया काय आहे?

भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा परिसरात एका व्यक्तीकडे शस्त्रसाठा असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर ती खरी असल्याचे दिसून आले. खबर बाहेर पडण्यापूर्वीच कारवाई करणे आवश्यक असल्याने पोलिसांनी तातडीने पथक उभे केले. गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पथकाने गोकुळधाम सोसायटीत छापा टाकून झा याला ताब्यात घेतले व शस्त्रे जप्त केली.

जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले, त्या अनुषंगाने जिवंत काडतुसे, 32 सेमी लांबीचा सुरा, 26 सेमीचा खंजीर, 22 सेमी लांबीचे चार चाकू, तसेच 84 सेमी लांबीची धारदार तलवार यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने 3 डिसेंबर पर्यत विनापरवाना शस्त्र बाळगणे, ठेवणे किंवा वापरण्यास निर्बंध घातले आहेत. या आदेशाचा झा यांनी भंग केला असून, बेकायदेशीर शस्त्रसाठाठेवणे व त्याचा संभाव्य गैरवापर या दोन्ही कारणांवरून मानपाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

व्हेंटिलेटरचा शोध कुणी आणि कधी लावला? त्याआधी उपचार कसे केले जात होते?

या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, झा याने हा साठा कुठून आणला, कोणाला विक्री करणार होते की निवडणुकीच्या काळात त्याचा वापर होणार होता, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.