पुणे : प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ रेल्वे गाड्यांचे डबे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथून धावणाऱ्या या आठ निवडक गाड्यांचे सध्याचे जुने (पारंपरिक) डबे कायमस्वरूपी बदलून त्या जागी अत्याधुनिक लिंक हॉफमन बुश (एलएचबी) डबे बसविले जाणार आहेत. जानेवारी २०२६ पासून या बदल केला जाणार आहे.
‘एलएचबी’ डब्याचे फायदे‘एलएचबी’ डबे हे पारंपरिक डब्यांपेक्षा अधिक सुरक्षित मानले जातात. अपघात झाल्यास हे डबे एकमेकांवर न चढता सरळ रेषेत राहतात.
परिणामी अपघात झाल्यास जीवितहानी कमी होण्यास मदत होते.
हे डबे अधिक मोठे, आवाज कमी करणारे आणि प्रवासादरम्यान कमी धक्के देणारे असल्यामुळे प्रवाशांना अधिक आराम मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस (२२१५७/२२१५८)
१४ जानेवारी व १७ जानेवारी २०२६ पासून या गाडीला १६ ‘एलएचबी’ डबे जोडले जातील. यात २ एसी टू टियर, ३ एसी थ्री टियर, ५ स्लीपर, ४ जनरल व गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असेल.
पुणे–वेरावळ, पुणे–भगत की कोठी, पुणे–भूज आणि पुणे–अहमदाबाद एक्स्प्रेस या चारही गाड्यांना अनुक्रमे १५, १८, १९ व २१ जानेवारीला नवीन डबे जोडले जातील. २० ‘एलएचबी’ डबे असतील.
कोल्हापूर–नागपूर, कोल्हापूर–हजरत निजामुद्दीन आणि कोल्हापूर– अहमदाबाद एक्स्प्रेस या तिन्ही गाड्यांना अनुक्रमे १९, २० व २४ जानेवारीला ‘एलएचबी’ डबे जोडले जाणार आहे.