काशिनाथ चौधरी: पालघर साधू हत्याकांडातील (Palghar sadhu case) आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhari) यांना भाजपने (BJP) पक्षात प्रवेश दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मागील काळात याच प्रकरणावरून भाजपने चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र अचानकच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. वाढत्या टीकेमुळे भाजप पक्षश्रेष्ठींनी तातडीने काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. आता पालघर प्रकरणावरून शिवसेनेकडून मित्र पक्ष भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
शिवसनेच्या अध्यात्मिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पालघर साधूंच्या हत्येतील आरोपीला पक्ष प्रवेश देऊन तात्काळ स्थगिती दिल्याने हे कसलं हिंदुत्व? असा सवाल उपस्थित करत अक्षय महाराज भोसलेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
अक्षय महाराज भोसले म्हणाले की, हे कसले प्रखर हिंदुत्व? हिंदुत्व म्हणजे तडजोडींचा बाजार नव्हे, तर सिद्धांतासाठी अग्नितही उभं राहण्याचं धैर्य. जे साधूंच्या रुधिरावर राजकीय गणित मांडतात, त्यांनी जाणून घ्यावे हिंदुत्व हे पक्षांच्या सिग्नलला हिरवा, पिवळा, लाल दाखवणारे दिवे नाहीत. हिंदुत्व म्हणजे निखळ सत्य, न्याय आणि निर्भयतेचा धर्मयुद्ध आहे. जर साधूंच्या हत्येवर आरोप करणाऱ्याच व्यक्तीस प्रवेश देत असतील, तर हा व्यवहार हिंदुत्वाचा नव्हे तर राजकारणाच्या रंगभूमीवर केलेल्या ढोंगी अभिनयाचा पुरावा आहे. हिंदुत्वाच्या मार्गावर चालायचं असल्यास पहिली अट स्पष्ट होती, की सत्याशी समझोता नाही, आणि हिंदुत्वावर सौदेबाजी नाही. आता प्रवेशाला स्थगिती देर आये दुरुस्त ना आये, असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, भाजपमधून प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर काशिनाथ चौधरी हे चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. काशिनाथ चौधरी म्हणाले की, प्रसार माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झालाय. समाज माध्यमांवर प्रतिमा मलीन केली जात आहे. आमचं जगणं मुश्किल केलेलं आहे. व्यक्तिगत मी सगळं सहन केला असतं. मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. या राजकारणासाठी माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल. परंतु यात माझे कुटुंब, माझी मुलं भरडले जात आहेत. मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो. मात्र मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. साधूंचा जीव वाचावा म्हणून पोलिसांनी मला तिथे नेलं. मात्र, जमाव इतका आक्रमक होता की आम्हाला तो सांभाळात आला नाही. कृपया यात वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
आणखी वाचा
आणखी वाचा