अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर सहानीला नुकतंच विमानप्रवासादरम्यान असा धक्कादायक अनुभव आला, जो ती कधीही विसरणार नाही. तिची मुलगी समारासुद्धा तिच्यासोबत विमानाने प्रवास करत होती. यावेळी दोघीही खूप घाबरल्या होत्या. रिद्धिमाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हा अनुभव सांगितला आणि देवाचे आभार मानले. ‘शुक्राना गुरूजी’ असं लिहित तिने नेमकं काय घडलं, त्याबद्दल लिहिलं. भीतीने दोघी मायलेकींची घाबरगुंडी उडाली होती आणि आधारासाठी त्यांनी एकमेकींचा हात घट्ट धरला होता. विशेष म्हणजे याच विमानात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेसुद्धा होते.
रिद्धिमाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘आज मी आणि माझ्या मुलीने असा क्षण अनुभवला, जो आम्ही कधीही विसरणार नाही. आमचं विमान अचानक खाली जमिनीवर उतरलं आणि त्यानंतर काही सेकंदातच पुन्हा उड्डाण केलं. त्या काही सेकंदांसाठी जणू आम्हा दोघींचं हृदय धडधडणं थांबलं होतं. जेव्हा घाबरून तिने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा मी तिचा हात घट्ट धरला. मी फक्त तिच्यासाठी खंबीर राहण्याचा प्रयत्न करू शकत होते आणि आतून शांतपणे माझ्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. काही क्षणांसाठी आम्ही प्रचंड घाबरलो होतो, पण आता आम्ही सुरक्षित आहोत आणि हेच खरं महत्त्वाचं आहे. असे अनुभव तुम्हाला हादरवून सोडतात पण हेच क्षण तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतात की आयुष्य किती नाजूक आणि मौल्यवान आहे.’
रिद्धिमाची पोस्ट-
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीसुद्धा अजिंक्य रहाणेसोबतचा व्हिडीओ पोस्ट करत अनुभव सांगितला आहे. ‘प्रिय अजिंक्य रहाणे.. दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणं खूप आनंददायी होतं. एक उत्तम खेळाडू म्हणून मी नेहमीच तुझं कौतुक केलं आहे, पण मला तुझी नम्रता आणि साधेपणादेखील खूप आवडला. मला माफ कर… आपलं विमान जमिनीवर उतरेपर्यंत माझी भाषा आणि बोलणं ठीक होतं, पण पुन्हा उड्डाण होताच माझ्या तोंडातून काही शुद्ध हिंदी शब्द बाहेर पडले. त्या भयानक क्षणामुळे मला मी एक सभ्य माणूस असल्यासारखं वाटलं. पण चांगली गोष्ट ही आहे की आपण दोघंही हा प्रवास अनेक कारणांसाठी कायम लक्षात ठेवू’, असा अनुभव त्यांनी सांगितला.