भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून भाईंदर पूर्व भागात बाळासाहेब ठाकरे कलादालन उभे राहिले आहे. या कलादालनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १७) लोकार्पण झाले. मिरा-भाईंदर शहरातील एक मुख्य आकर्षणाची वास्तू म्हणून हे कलादालन आता उदयाला असले तरी त्याच्या उभारणीला शिवसेनेच्या संघर्षाची पार्श्वभूमी लाभली आहे. कलादालनाचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत फेटाळला गेल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आठ वर्षांपूर्वी महापौर दालनात तोडफोड केली होती. या गुन्ह्यातून शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांसह अन्य शिवसैनिकांची नुकतीच निर्दोष सुटका झाली. त्यामुळे कलादालनाचे लोकार्पण आणि आंदोलनाच्या गुन्ह्यातून सुटका असा दुग्धशर्करा योग यानिमित्त शिवसैनिकांना अनुभवायला मिळाला. आंदोलनकर्त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
भाईंदर पूर्व येथील आझाद नगर परिसरात असलेल्या सामाजिक वनीकरणासाठी राखीव भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कलादालन उभरण्याची संकल्पना प्रताप सरनाईक यांनी आठ वर्षांपूर्वी मांडली होती. त्या वेळी मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप व शिवसेनेची युती असतानाही दोघांमधून विस्तवही जात नव्हता. या पार्श्वभूमीवर कलादालन उभारण्याचा विषय २०१८ मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती, मात्र भाजपचा सभापती असलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय फेटाळण्यात आला. शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरे कलादालन हा विषय अत्यंत संवेदनशील होता, मात्र तो फेटाळला गेल्याने सेना नगरसेवक चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी सभागृहातून बाहेर पडत महापौर दालनाकडे मोर्चा वळवला व दालनाची येथेच्छ तोडफोड करून आपला राग व्यक्त केला. याप्रकरणी सेनेच्या तब्बल १८ नगरसेवक व काही शिवसैनिकांवर भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्व नगरसेवक भूमिगत झाले. त्यानंतर दोन महिन्यांनी अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर हे नगरसेवक शहरात पुन्हा अवतरले होते.
न्यायालयाकडून निर्दोष सुटका
गेली आठ वर्षे ठाणे न्यायालयात हा खटला सुरू होता. सेना नगरसेवकांची बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने दिग्गज वकील न्यायालयात उभे केले. अखेर दोन महिन्यांपूर्वी या सर्व नगरसेवकांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने या आंदोलनाच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.
नगरसेवकांचा जाहीर सत्कार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांनी कलादालनासाठी केलेल्या आंदोलनाचे कौतुक केले व सर्व नगरसेवकांचा जाहीर सत्कार केला. या कलादालनाच्या निमित्ताने बाळासाहेबांचा इतिहास जिवंत तर होणारच आहे, मात्र कलादालनाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या संघर्षाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्याचीही आठवण वेळोवेळी होणार आहे.