आगरी-कोळी समाजाचाच महापौर पाहिजे अन्यथा...
कोळी महासंघाचा राजकीय पक्षांना इशारा
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कोळी महासंघ (ठाणे जिल्हा) आयोजित पदनियुक्ती सोहळा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिमेतील समेळ मंगल कार्यालय येथे हा सोहळा आयोजित केला होता. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली, तर ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेवर आगरी-कोळी समाजाचाच महापौर बसला पाहिजे अन्यथा दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा कोळी महासंघाच्या वतीने राजकीय पक्षांना देण्यात आला.
या कार्यक्रमात महासंघ कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, चिटणीस राजहंस टपके, सहसचिव सतीश धडे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश पाटकर, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील, सुभाष बाबडे, काशिनाथ बामगिने, सतीश देशेकर, भावेश पाटील, सुभाष कोळी, रवींद्र भंडारी, हनुमान कोळी, दशरथ पाटील, ज्ञानेश्वर भोईर, राजू कोट, भीमसेन पाटील आदी मान्यवरांसह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी रमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना महासंघाची ताकद अधिक बळकट करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी रणनीती आखण्याबाबत आणि कोळी समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या मुद्द्यांवर मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना पुढील कामकाजासाठी योग्य दिशा देण्यात आली.
आगरी-कोळी समाजातील प्रतिनिधींना डावलले जाते
कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी आगरी-कोळी समाजात आता एकजूट झाली आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्या असून, मुंबई ठाणे जिल्ह्यात आगरी-कोळी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. जिल्ह्याच्या विकासातदेखील आगरी-कोळी समाजाचा मोलाचा वाटा आहे, मात्र आगरी कोळी समाजातील लोकप्रतिनिधींना महापौरपद दिले जात नाही, डावलले जाते, अशी खंत व्यक्त केली. पुढे बोलताना आगरी-कोळी समाजातील लोकप्रतिनिधीमधूनच महापौर नियुक्त करावा अन्यथा विचार करावा लागेल, असा इशारा राजकीय पक्षांना दिला.