माळेगाव - माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय समिकरणे हळूहळू स्पष्ट होत आहेत. अधिकृत उमेदवार अविनाश सदाशिव तावरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक कचेरीत वेळेत पोचला नाही.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रभाग १३ मधील जागेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला पवार - तावरे पॅनेलला पाठिंबा द्यावा लागणार आहे. परंतु, अर्ज लेट झाल्याने पक्ष कोणामुळे अडचणीत आला, असा सवाल करीत कार्य़कर्त्यांतीनी संताप व्यक्त केला.
माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत आज एक धक्कादायक घडामोड समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत इच्छुक अविनाश तावरे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक कचेरीत वेळेत न पोहोचल्याने संबंधित प्रभागातील पक्षाची जागा प्रत्यक्षात रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले. या अनपेक्षित परिस्थितीने पक्षाच्या गोटात मोठी खळबळ माजली.
स्थानिक पातळीवर ऐनवेळी नव्या राजकीय चर्चांना उधाण आले. या घटनाक्रमाची जबाबदारी कोणावर येते, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग १३ मध्ये अधिकृत उमेदवार अविनाश तावरे यांचे नाव वगळता या प्रभागात अपक्ष उमेदवार धैर्य़शिव तावरे, युवराज लोणकर, गौरव लोणकर यांचा समावेश आहे. या अपक्ष उमेदवारांपैकी एकाला पाटींबा देण्याची वेळ पवार-तावरे पॅनेलवर आली आहे.
या राजकीय घडामोडीत कोणाची लाॅटरी पक्षाच्या वतीने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत जागाच रिक्त राहिल्याने त्या प्रभागात प्रतिस्पर्धी स्थानिक गटांनी सक्रियता वाढवली आहे. अपक्ष उमेदवाराला देखील अचानक 'वाऱ्याची दिशा बदलल्याचा' फायदा मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
छाननी प्रक्रियेत ७ अर्ज बाद...
माळेगाव निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण १२२ अर्ज वैद्य ठरले. त्यामध्ये एक नगराध्यक्ष पदाचा व सहा नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरला. गणेश संपत खरात यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज व इतर सहा उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी दिली.