गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. खासकरून पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होती. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारज पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे. आसिफ यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे गेल्या काही दिवसांपासून तालिबानला युद्धाची धमकी देत आहेत, मात्र आता त्यांनी भारताला धमकी दिली आहे. आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तान विरूद्ध भारतासोबत युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संपूर्ण देश सतर्क आहे. आसिफ यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. कारण लाल किल्ला बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचे नाव समोर येत आहे. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे आसिफ यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, ‘आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाही. मी युद्ध किंवा भारताकडून कोणत्याही शत्रुत्वाच्या रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही.यामध्ये सीमापार घुसखोरी किंवा हल्ल्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल.’ याआधी भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख 88 तासांचा ट्रेलर असे केले होते. त्यानंतर आता काही दिवसांनी आसिफ यांनी हे विधान केले आहे. द्विवेदी म्हणाले होते की, ‘जर परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही पाकिस्तानला जबाबदारीने कसे वागावे हे शिकवण्यास तयार आहे.’
दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जण ठार झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय भूमीवरील हा दुसरा मोठा हल्ला होता. एनआयएने या हल्ल्याला आत्मघातकी हल्ला असे म्हटले होते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला आसिफ यांनी आक्रमक भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी युद्धाची शक्यता वर्तवली आहे.