नारायणगाव - उसातून आलेल्या दोन बिबट्यांनी शेतात चरत असलेल्या मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला.
या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या. मेंढपाळ महिलेने बिबट्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी आरडाओरडा केला. दरम्यान एक बिबट्या मेंढी घेऊन उसाच्या शेतात गेला. महिलेच्या प्रतिकारामुळे एक बिबट्या ठार केलेली मेंढी सोडून उसाच्या शेतात निघून गेला.
बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने मेंढपाळ महिला व मेंढपाळाचा लहान मुलगा वाचला. अंगावर शहारे आणणारी ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव जवळील गव्हाळी मळा शिवारात घडली. या भागात बिबट्यांच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पळशी वनकुटे (ता. पारनेर) येथील लिलाबाई चिमा केसकर (वय-30) यांनी नारायणगांव येथील गव्हाळी मळा शिवारातील मोकळ्या शेतात मेंढ्यांचा वाडा लावला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बाबू शेटे यांच्या उसाच्या शेताजवळ असलेल्या मोकळ्या शेतात मेंढ्या चरत होत्या. दरम्यान अचानक उसातून उसाच्या शेतातून आलेल्या दोन बिबट्यांनी मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला.
यावेळी मेंढ्यांसोबत लिलाबाई केसकर व त्यांचा लहान मुलगा होता.लिलाबाई यांनी आरडाओरडा करून हातातील काठी आपटून बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात एक बिबट्या मेंढी घेऊन उसाच्या शेतात गेला.
तर दुसऱ्या बिबट्याने तोंडातील मेंढी सोडून उसाच्या शेतात धूम ठोकली. बिबट्याच्या जबड्यातून मेंढी सुटली असली तरी ती मृत झाली. सुदैवाने बिबट्याने महिला व लहान मुलावर हल्ला केला नाही.
महिलेचा आरडाओरडा ऐकून अमित शेटे, उपसरपंच बाबू पाटे, सुरज वाजगे, राजू भोर यांच्यासह इतर शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना याबाबतची माहिती दिली. संतप्त नागरिकांनी बिबट्याला शूट करण्याची मागणी केली.
ज्ञानेश्वर पवार (वनरक्षक) -
घटनास्थळी जाऊन मृत मेढ्यांचा पंचनामा केला आहे. नारायणगाव परिसरात सहा ठिकाणी पिंजरा लावला आहे. पिंजरा उपलब्ध होताच घटनास्थळी पिंजरा लावण्यात येईल. बिबट्याच्या तोंडातील भक्ष काढून घेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास बिबट्या प्रती हल्ला करण्याचा शक्यता असते.