IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान उपांत्य फेरीत आमनेसामने येणार नाहीत, कारण काय?
Tv9 Marathi November 20, 2025 02:45 AM

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याची चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. भारताने सप्टेंबर महिन्यात टी 20I आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानला 3 वेळा पराभूत केलं. वूमन्स टीम इंडियानेही वर्ल्ड कप स्पर्धेत शेजाऱ्यांना लोळवलं. हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतही भारताच्या निवृत्त खेळाडूंनीही पाकिस्तानला पराभूत केलं. मात्र इंडिया ए टीम एमर्जिंग आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्यात अपयशी ठरली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताने मंगळवारी 18 नोव्हेंबरला ओमानला पराभूत करत उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. तर त्याआधी पाकिस्तानने आधीच सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने नसणार हे स्पष्ट आहे. या मागील कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

बी ग्रुपचं सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेत. बी ग्रुपमधून भारत आणि पाकिस्तान या संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे या संघांमध्ये उपांत्य फेरीतील सामना होणार नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानसमोर उपांत्य फेरीत ए ग्रुपमधील संघांचं आव्हान असणार आहे. ए ग्रुपमधून हाँगकाँगचं साखळी फेरीतच पॅकअप झालं आहे. त्यामुळे 3 जागांसाठी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस आहे.

बांगलादेशने जवळपास उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यापैकी कोणता संघ उपांत्य फेरीत पोहचतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बांगलादेश ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात 19 नोव्हेंबरला सामना खेळवण्यात येत आहे. श्रीलंकेला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. तसेच बांगलादेशने हा सामना जिंकल्यास अफगाणिस्तान सेमी फायनलसाठी पात्र ठरेल. मात्र टीम इंडियासमोर उपांत्य फेरीत अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या तिघांपैकी कोणत्याही संघाचं आव्हान असेल हे स्पष्ट आहे.

भारत पाकिस्तान फायनल होणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरीत आमनेसामने नसणार हे स्पष्ट आहे. मात्र हे दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतील आपले सामने जिंकल्यास चाहत्यांना महामुकाबला पाहायला मिळू शकतो. या स्पर्धेतील अंतिम उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे 21 नोव्हेंबरला होणार आहेत. तर महाअंतिम सामना 23 नोव्हेंबरला होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.