गरुड पुराण हा एक हिंदू धर्मामधील महत्त्वाचा ग्रंथ आहे, गरुड पुराणाचा समावेश हा 18 पुरांणांमध्ये होतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याचा प्रवास कसा होतो? त्याला त्याच्या कर्माची फळं कशी मिळतात? कोणत्या पापासाठी कोणती शिक्षा असते? या सर्व गोष्टींचं वर्णन गरुड पुराणामध्ये सविस्तर करण्यात आलं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा गरुड पुराण ऐकवलं जातं. साधारणपणे 13 दिवस गरुड पुराण ऐकवलं जातं. गरुड पुराणामुळे मृत आत्म्यास शांती मिळते, अशी हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे. गरुड पुराणानुसार पृथ्वीवर ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा एक दिवस मृत्यू निश्चिच आहे. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. परंतु कोणताही मनुष्य प्राणी मृत्यूला स्वीकारण्यास तयार नसतो, त्याने आपलं मन संसारामध्ये एवढं गुंतून ठेवलेलं असतं, की मृत्यूनंतर देखील त्याला लवकर शांती मिळत नाही.
हिंदू धर्मानुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, म्हणजे नेमकं काय होतं? तर आत्मा त्या व्यक्तीचं शरीर सोडतो. परंतु जरी आत्म्याने ते शरीर सोडलेलं असलं तरी देखील त्याला त्या शरीराचा मोह सुटलेला नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ असते, तेव्हा शेवटच्या क्षणी त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात काय -काय केलं त्याचा एक पट एका सेंकदात त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो, त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीरातून मुक्त होतो. मात्र आपण आता शरीर नाही आहोत, आपण शरीरापासून मुक्त झालो आहोत, ही जाणीव व्हायला आत्म्याला थोडा वेळ लागतो. आत्म्याचा वावर जिथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिथेच तोपर्यंत असतो. त्याला त्याच्या परिचयाचे सर्व आवाज ऐकू येतात, मात्र तो कोणाशीही संवाद साधू शकत नाही. जेव्हा त्याला याची जाणीव होते की आता आपण या शरीराचा त्याग केला आहे, तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात, असं गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेव्हा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं शरीर जाळलं जातं, तेव्हा खऱ्या अर्थाने आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो, असं हिदू धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. गुरुड पुराणानुसार व्यक्तीचे कर्म ठरवतात तो स्वर्गात जाणार की नरकात. नरकात वेगवेगळ्या शिक्षा असतात, ज्या व्यक्तीने जशी कर्म केले आहेत, त्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाते, असं गरुड पुराणामध्ये म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)