नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या दमदार कामगिरीने देशभरातील तरुणाईला प्रेरणा मिळाली आहे. केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील विविध शाखांमध्ये व्यावसायिक करिअर घडवण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. क्रीडा हा आता छंदापुरता मर्यादित न राहता रोजगार आणि आत्मविकासाचा मार्ग ठरत आहे.
क्रीडा क्षेत्रात करिअर करणे म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, नेतृत्वगुण, संघभावना आणि सातत्य या सर्व गुणांचा संगम. क्रीडा क्षेत्रात खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, फिटनेस ट्रेनर, क्रीडा पत्रकार, इव्हेंट मॅनेजर, अॅनालिस्ट, अंपायर, तसेच क्रीडा प्रशासनातील अधिकारी अशा अनेक भूमिका निभावता येतात.
भारतामधील प्रमुख खेळ
खेळाडू म्हणून करिअर करायचे असल्यास क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, ॲथलेटिक्स (धावणे, उडी, थ्रो इ.) बॉक्सिंग, शूटिंग, टेनिस, टेबल टेनिस, स्वीमिंग, आर्चरी, रोलबॉल स्केटिंग, जिम्नॅस्टिक्स, साहसी खेळ (ट्रेकिंग, रॉक क्लायंबिंग, स्कूबा डायव्हिंग) इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
क्रीडा शिक्षण आणि अभ्यासक्रम
क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक मार्गाने प्रवेश करण्यासाठी अनेक पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी.पी.एड., बी.एस.सी. इन स्पोर्ट्स सायन्स, बीबीए इन स्पोर्ट््स मॅनेजमेंट, फिटनेस आणि न्यूट्रिशन, क्रीडा मानसशास्त्र, तसेच फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
या अभ्यासक्रमांमध्ये शरीररचना, पोषण, प्रशिक्षण तंत्र, मानसशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान आणि आरोग्य व्यवस्थापन यांचा समावेश असतो. बी.पी.एड साठी साधारणतः बारावी किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. काही विद्यापीठे प्रवेशासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेतात. राष्ट्रीय स्तरावर ‘स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ व विविध राज्य क्रीडा अकादमींमार्फत प्रशिक्षण व शिष्यवृत्ती दिल्या जातात.
करिअरच्या संधी आणि भूमिका
क्रीडा क्षेत्रातील स्पष्ट आणि प्रसिद्ध मार्ग म्हणजे व्यावसायिक खेळाडू बनणे. याशिवाय अनेक पूरक क्षेत्रे उभी राहिली आहेत. प्रशिक्षक (कोच) हे शाळा, महाविद्यालये किंवा अकादमींमध्ये काम करू शकतात. क्रीडा व्यवस्थापक किंवा इव्हेंट प्लॅनर मोठ्या स्पर्धांचे आयोजन करतात. क्रीडा पत्रकार माध्यमांमध्ये खेळांवरील विश्लेषण करतात.
फिजिओथेरपिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट हे खेळाडूंच्या आरोग्याच्या देखभालीसाठी महत्त्वाचे असतात. डेटा अॅनालिस्ट आणि टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट हे क्रीडा कामगिरी मोजण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करतात.
करिअरमधील अडथळे आणि मर्यादा
खेळाडू म्हणून यशस्वी करिअर घडवताना काही महत्त्वाच्या अडचणींचा सामना करावा लागतो. एकूणच सर्व खेळांमध्ये आर्थिक साहाय्य आणि स्पॉन्सरशिपची कमी असते, उच्च दर्जाचे प्रशिक्षण खूप महाग असते, स्पर्धा अत्यंत जास्त असल्यामुळे निवड होणे कठीण असते, सतत इजा होण्याचा धोका असतो आणि खेळाडूचे करिअर दीर्घकाळ टिकत नसल्यामुळे बॅकअप शिक्षण असणे गरजेचे ठरते.
निष्कर्ष
क्रीडा क्षेत्र हे केवळ स्पर्धा जिंकण्याचे नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि नेतृत्वगुणांचा प्रभावी मार्ग आहे. खेळाडू, प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, पत्रकार, विश्लेषक अशा अनेक करिअर संधी उपलब्ध असल्या तरी आर्थिक मर्यादा, महाग प्रशिक्षण, तीव्र स्पर्धा आणि करिअरचा कमी कालावधी यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन, सातत्य आणि बॅकअप शिक्षण असल्यास तरुणांना क्रीडा क्षेत्रात यशस्वी करिअर घडवणे निश्चितच शक्य होऊ शकते.