swt194.jpg
05373
दादरः छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांची प्रतिकृती स्पर्धेतील शिवप्रेमींचा सन्मान करताना अप्पा परब, सुनील पवार, रणजित सावरकर, मंजिरी मराठे आदी.
शिवरायांचा इतिहास तरुणांमध्ये रुजवा
सुनील पवारः दादर येथे गड-दुर्ग प्रतिकृती स्पर्धेतील शिवप्रेमींचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ः शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणाईमध्ये रुजवणे हे आमचे ध्येय आहे. यासाठी श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती सातत्याने कार्य करत असते. याच भावनेतून महाराजांच्या गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचे आवाहन केले होते. शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेणारी आणि त्यानुसार कार्य करणारी पिढी तयार झाली, तरच आमचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले.
श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचा सन्मान सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (पश्चिम) येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिवप्रेमी उपस्थित होते. या सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब हे होते. या कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याबरोबर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नात असिलता सावरकर, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, स्मारकाचे विश्वस्त व निवृत्त पोलिस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. परब यांनी, आज तरुणाई शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्यासाठी पुढे येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त समजून घेऊन उपयोग नाही, तर तो जगला देखील पाहिजे, तरच आज आपल्याला आपली संस्कृती जपणे शक्य होईल, असे सांगितले. रणजित सावरकर यांनी, आज शिवाजी महाराजांच्या चरित्रातील त्रिसुत्री अंगी बाणविण्याची गरज आहे, तरच आपण समर्थ राष्ट्र घडवू शकू, असे मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर कायमच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत असत. शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र यायचे असेल तर जात-पात सर्व काही विसरून हिंदू म्हणून एकत्र या. आपल्या सर्वांहून हे राष्ट्र श्रेष्ठ आहे, ही भावना ठेवून काम करणे, हीच काळाची गरज आहे, असे मंजिरी मराठे यांनी सांगितले. या सोहळ्यात स्पर्धेत सहभाग घेतलेल्या शिवप्रेमींचा तसेच संस्थांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.