पुणे, ता. २० : ‘‘खरा लेखक सर्जनाच्या सर्व शक्यता तपासून पाहतो. बंदिस्त चौकटीत न अडकता विविध विषय हाताळत, सर्वसमावेशक सूत्रे आपल्या साहित्यकृतीतून मांडतो. हे सूत्र स्वीकारत ललिता सबनीस यांनी जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता दर्शवत मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन आपल्या साहित्यकृतींमधून घडविले आहे,’’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले.
संस्कृती प्रकाशनतर्फे ललिता श्रीपाल सबनीस लिखित ‘संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ चार पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यावेळी जोशी बोलत होते. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, कवयित्री अंजली कुलकर्णी, साहित्यिक वि. दा. पिंगळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आदी यावेळी उपस्थिती होते. ललिता सबनीस म्हणाल्या, ‘‘ साक्षरता पालकत्व, कुटुंब प्रबोधन, नातेसंबंध, महान स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या साहित्यकृतींमधून घेण्यात आला आहे.’’
पिंगळे म्हणाले, ‘‘संसारी शहाणपण या साहित्यकृतीतून ललिता सबनीस यांनी सुखी संसाराची गुरुकिल्लीच वाचकांच्या हाती दिली आहे. आजच्या काळातील मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा एकसंध व्हावी याकरिता हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.’’ प्रास्ताविक सुनीताराजे पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन दिनेश फडतरे यांनी केले.
------