प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २० : गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. लोकसभा निवडणूक ते आतापर्यंत या पक्षामध्ये अनेकांनी प्रवेश केला, मात्र त्याचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येत आहे. पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपमध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आला आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज असून, या निराशेचा फटका निवडणुकीत भाजपला बसेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर नगर परिषदेत भाजपमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज व त्यांच्यासोबत एबी अर्ज सादर करण्याच्या दिवशी सोमवारी (ता. १७) सादर करण्यात आले. एबी अर्जांसाठी यादी पालघरमधील काही भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यामध्ये अनेक जुने कार्यकर्ते इच्छुक असूनही नगरसेवक वा नगराध्यक्षपदासाठी संधी दिली नाही. या यादीमध्ये नुकताच शिवसेनेच्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातून प्रवेश घेतलेल्या संधी दिली आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाजपचे निष्ठावंत व अनेक वर्षे कार्य केलेल्या माजी नगरसेविका लक्ष्मी हजारे, तसेच पालघर नगर परिषदेचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारे भाजपचे माजी नगरसेवक अरुण माने व इतर निष्ठावंत इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले आहे. पक्षातील अजून काही निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त करून जिल्हा नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत याचा फटका पडणार असल्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहे. या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी पक्ष कशी दूर करतो, हे आगामी दिवसांत दिसून येणार आहे.
पालघर नगर परिषदेमध्ये भाजपने फक्त दोन माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीची संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवक्ते केदार काळे यांनीही नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज सादर केलेला आहे, तर त्यांच्या गृहिणी उज्ज्वला काळे यांना शिवसेना शिंदे गटाने नगरसेवकपदासाठी संधी दिली आहे. केदार काळे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे, मात्र रिंगणात कोण राहणार, हे उद्या (ता. २१) अर्ज मागे घेतल्यानंतरच खरे चित्र उमटणार आहे, मात्र सध्या तरी प्रचाराला रंगत आली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपापल्या भागात बैठका सुरू केल्या आहेत.