Satara Crime:'लाचप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला शिक्षा'; दुचाकी परत देण्यासाठी पाच हजारांची घेतली हाेती लाच
esakal November 21, 2025 04:45 PM

सातारा : दारू वाहतुकीच्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा..

भिवा लक्ष्मण येळे (रा. भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. मार्च २०१७ मध्ये ते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोरेगाव कार्यालयात दुय्यम निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार याच्या चालकावर दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली दुचाकी परत देण्यासाठी येळे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार २० मार्च २०१७ ला येळे याला पाच हजार रुपये घेताना पकडण्यात आले होते.

याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. एस. कुरळे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायाधीश तांबोळी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..

साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी वकील मिलिंद ओक यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश तांबोळी यांनी येळे याला तीन वर्षे सक्तमजुरी, एक लाख दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.