असं छिछोरं कृत्य..; प्रसिद्ध अभिनेत्रीने थेट आलिया भट्टच्या काकाचा कॉल रेकॉर्डिंग केला लीक
Tv9 Marathi November 21, 2025 05:46 PM

‘टी-सीरिज’चे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने सोशल मीडियावर एका फोन रेकॉर्डिंगची ऑडिओ क्लिप पोस्ट करत निर्माते मुकेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सावी’ आणि ‘जिगरा’ या दोन चित्रपटांवरून हा वाद निर्माण झाला होता. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. यावरून आता हा वाद इतका वाढला आहे की थेट दिव्याने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केला आहे. दिव्याने आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या चित्रपटाला ‘सावी’ची कॉपी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मुकेश भट्ट यांनी तिच्या या दाव्याला पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं होतं. आलियाला कॉपीची गरज नाही, असं उत्तर त्यांनी दिव्याला दिलं होतं. त्यांच्या या उत्तरामुळे दिव्या भडकली आणि तिने कॉल रेकॉर्डिंग लीक केला.

या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिव्या त्यांना विचारते की “तुम्ही ‘सावी’ आणि ‘जिगरा’च्या वादावर माझ्याविरोधात वक्तव्य का केलं? फक्त प्रसिद्धीसाठी मी हे छिछोरी कृत्य केलं, असं तुम्ही म्हणालात का?” त्यावर मुकेश तिला म्हणतात, “मी याबद्दल कोणाशीच बोललो नव्हतो आणि मला कोणी विचारलंसुद्धा नाही. हे सर्व प्लॅनिंग केलंय. मी असं कृत्य का करेन? हे तुझ्या वाढदिवशीच का झालं? या गोष्टीमुळे तुझ्या आणि माझ्या नात्यावर कोणताच परिणाम होणार नाही. तू कोणाचंच बोलणं ऐकू नकोस. तू मला ओळखतेस, मी असं का करेन?”

ऐका ऑडिओ-

View this post on Instagram

A post shared by Divya ‘Chatur Naar’ khossla (@divyakhossla)

दिव्याने ही ऑडिओ क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “या खुलाश्याने मी चकीत झाले आहे. नुकतंच मला जे कळलं, ते अस्वस्थ करणारं आणि हादरवून सोडणारं होतं. हे सत्य लोकांसमोर आणणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतंय. विशेषकरून त्या सर्व कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी ज्यांना आमच्या फिल्म इंडस्ट्रीतील पदानुक्रम, लॉबिंग आणि गेटकीपिंगचा (एखाद्यावरील नियंत्रण) त्रास सहन करावा लागला आहे. दुर्दैवाने मुकेश भट्ट आणि माझ्यातील कॉल रेकॉर्डिंग पोस्ट करण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय उरला नाही. जेणेकरून लोक स्वत: ते ऐकतील की कशा पद्धतीने काही गट करिअरमध्ये अडथळा आणण्याचा आणि खऱ्या प्रतिभेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. हे वर्तन अस्वीकार्य आहे. आता आपण बोलायची वेळ आली आहे. इंडस्ट्रीतील माफियांवर निशाणा साधायची वेळ आली आहे. याविरुद्ध मी आवाज उठवेन.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.