पॅनल पद्धतीने होणारी निवडणूक गोंधळात टाकणारी!
esakal November 21, 2025 05:46 PM

पॅनेल पद्धतीने होणारी निवडणूक गोंधळात टाकणारी!
निवडणूक आयोग व प्रशासनाकडून मार्गदर्शनाची नागरिकांची मागणी!

बदलापूर, ता. २० (बातमीदार) ः १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला, तरी या निवडणुकीपूर्वीच शहराच्या प्रभागरचना आणि पॅनेल प्रणालीबाबत चर्चेचा आणि गोंधळाचा माहोल निर्माण झाला आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भाजपकडून या प्रभागरचनेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला होता. प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना शासनाने शिंदे गटाच्या दबावाखाली निर्णय घेतल्याची चर्चा त्या वेळी रंगली होती. यासंदर्भातील तक्रारी निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्यांकडे आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर अखेर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

२०१५ मध्ये झालेली बदलापूर पालिकेची शेवटची निवडणूक नागरिकांना अजूनही आठवते. त्यानंतर २०२० मध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते, परंतु कोविड महामारीमुळे ती पाच वर्षे पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे तब्बल १० वर्षांच्या अंतरानंतर होणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २०१५ च्या निवडणुकीत बदलापूर पालिकेचे एकूण ४७ प्रभाग होते, मात्र यंदाच्या २०२५ च्या निवडणुकीत दोन प्रभागांची वाढ होऊन एकूण ४९ प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात यंदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा बदल म्हणजे, पॅनेल पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या वेळेस प्रत्येक दोन प्रभागांचा एक पॅनेल तयार केला आहे, तर शेवटचा पॅनेल तीन प्रभागांचा असणार आहे. त्यामुळे एकूण २४ पॅनेलमध्ये निवडणुका होणार आहेत.

या नव्या प्रणालीमुळे मतदारांना काही प्रमाणात गोंधळ वाटत आहे. प्रत्येक पॅनेलमध्ये दोन उमेदवार असल्याने मतदारांना नगरसेवकपदासाठी दोन उमेदवारांना मतदान करावे लागणार, तर नगराध्यक्षपदासाठी एक मत द्यावे लागेल. त्यामुळे एकूण तीन वेळा मतदान करण्याची प्रक्रिया असेल, मात्र विशेष बाब म्हणजे पॅनेल क्रमांक १५ मध्ये तीन प्रभागांचा समावेश असल्याने त्या ठिकाणी तीन नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा चार वेळा मतदान करावे लागणार आहे. या बदललेल्या मतदान पद्धतीमुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यामुळे पॅनेल पद्धतीबाबत स्पष्ट मार्गदर्शन आणि माहितीपत्रिका प्रत्येक मतदारापर्यंत प्रशासनाने व निवडणूक आयोगाने पोहोचवावी. मतदानाच्या दिवशी गोंधळ उडू नये व मतदारांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी प्रशासनाकडून ही दखल घेणे गरजेचे असल्याचे, अनेक जाणकारांचे मत आहे. त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषकांच्या मते, नवीन पॅनेल प्रणाली, वाढलेले प्रभाग आणि थेट नगराध्यक्ष निवडणूक या सर्व गोष्टींमुळे यंदाची निवडणूक बदलापूरसाठी ऐतिहासिक ठरणार आहे, मात्र मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती घेतल्यासच लोकशाहीचा उत्सव सुरळीत पार पडेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.