धुळे: पिंपळनेर (ता. साक्री) येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये स्थापनेनंतर नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होऊ घातली आहे. यात नगराध्यक्षपदाची पहिली माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय आहे. याअनुषंगाने गतिमान राजकीय घडामोडी पाहता महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चुरशीची लढत होणार आहे.
त्याचा अंदाज असल्याने भाजपने साक्री मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. तसेच पिंपळनेरला शत-प्रतिशत भाजप, असा नारा नेत्यांनी दिला आहे. या सत्तासंघर्षात आमदार गावित, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित भाजपला कसा शह देतात, याची उत्कंठा असेल.
पिंपळनेरला दहा प्रभागांतील २० जागांसाठी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. साक्री विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेच्या आमदार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक मंजुळा गावित करीत आहेत. त्यांना भक्कम साथ त्यांचे पती तथा जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित देत आहेत. अलिकडे भाजपने हा मतदारसंघ काबिज करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित दाम्पत्याने मुत्सद्दीपणातून तो शिवसेनेकडे खेचून आणला.
चौरे कुटुंबात फूट?
साक्री विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यात काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे यांचेही वर्चस्व होते. सध्या त्यांचे सुपुत्र प्रवीण चौरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार चौरे यांच्या चुलत सून डॉ. योगिता जितेश चौरे यांनी भाजपची वाट धरत नगराध्यक्षपदासाठी दावेदारी केली आहे.
याउलट माजी खासदार चौरे यांच्या दुसऱ्या सून प्रतिभा प्रकाश चौरे यांनी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदारी केली आहे. ही स्थिती लक्षात घेता चौरे कुटुंबात फूट पडल्याचे दिसून येते, तर या निवडणुकीत सुरूवातील सर्व २० जागांवर उमेदवार देण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला जेमतेम ६ उमेदवार देता आले आहेत.
पडद्याआड घडेल काय?
या घडामोडीत काँग्रेसने स्वतःहून फसगत करून घेतल्याचा सूर जाणकारांमध्ये उमटत आहे. यात आमदार गावित यांचा सत्तेचा वारू या निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपला पडद्याआडून काँग्रेसचा एखादा गट किंवा चौरे कुटुंबातील काही सदस्य मदत तर करणार नाहीत ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात होताना दिसते. त्यामुळे चौरे कुटुंब आणि काँग्रेसच्या हालचालींवरही अनेकांचे लक्ष असणार आहे.
अशा या रंगतदार लढतीत शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ललिता प्रेमानंद गायकवाड यांना नगराध्यक्षपदी उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा चंग बांधला आहे. शिवाय भाजप आणि शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीतून महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजना अशोक सोनवणे, अपक्ष गायत्री साहेबराव देशमुख, अपक्ष जयश्री शिवम ठाकरे यांनी आव्हान निर्माण केल्याने मत विभाजनचा प्रश्न ऐरणीवर असेल.
उमेदवारीबाबत दमछाक
भाजपने पिंपळनेरलाही स्व-बळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहाजिकच महायुतीतील सत्ताधारी शिवसेनेने लढा देण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही पक्ष सर्व २० जागांवर उमेदवार देऊ शकले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकूण २० पैकी १५ जागांवर उमेदवार देऊ शकले आहेत.
Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाईशिवाय तब्बल ४९ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करत रंगत आणली आहे. ही स्थिती लक्षात घेता महाविकास आघाडीची उमेदवार शोधासह त्यांना जागावाटप करताना दमछाक झाल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीमुळे मत विभाजन कसे होते आणि त्याचा लाभ भाजपला होतो की शिवसेनेला हा विजयाच्या राजकीय गणितात महत्त्वाचा भाग ठरणार आहे.