बांगलादेशने 20 षटकात 6 गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान टीम इंडियासमोर ठेवलं. पण भारतीय संघ 194 धावा करू शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. खरं तर सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघ बांगलादेशला आरामात हरवेल असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण चुकीच्या निर्णयामुळे भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या स्पर्धेत वैभव सूर्यवंशी फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. युएईविरुद्धची शतकी खेळी, पाकिस्तानविरुद्ध 45 धावा आणि या सामन्यातही आक्रमक खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे सुपर ओव्हरच्या 6 चेंडूसाठी पॉवर हिटिंग करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला संधी जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालंच नाही. त्यामुळे चाहत्यांना या निर्णयाचा धक्का बसला. भारताकडून कर्णधार जितेश शर्मा आणि नमन धीर उतरला. हे पाहूनच चाहत्यांनी डोक्यावर हात मारून घेतला होता.
कर्णधार जितेश शर्मा आणि नमन धीर ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या चेंडूचा सामना करण्यााच निर्णय जितेश शर्माने घेतला. पण पहिल्याच चेंडूवर रिपोन मोंडोलने त्याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर आशुतोष शर्मा फलंदाजीला आला. त्यानेही रिपोनच्या दुसऱ्या चेंडूवर सोपा झेल हातात दिला आणि तंबूत परतला. त्यामुळे भारताचा सुपर ओव्हरचा खेळ दोन चेंडूतच संपला. बांगलादेशला विजयासाठी एक धाव हवी होती. पहिल्याच चेंडूवर एक विकेट मिळाली. त्यामुळे आशा जिवंत होत्या. पण त्यानंतर वाइड चेंडू टाकला आणि सामना गेला. पण वैभव सूर्यवंशीला फलंदाजीला का पाठवलं नाही? कारण त्याने या स्पर्धेतील चार सामन्यात 98 चेंडूत 239 धावा केल्या होत्या. त्यात 22 षटकार होते. तरीही त्याला डावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्णधार जितेश शर्माने सामन्यानंतर असा निर्णय का घेतला याचा खुलासा केला. जितेश शर्माने सांगितलं की, वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या हे पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करतात. जेव्हा डेथ ओव्हर्समध्ये खेळायचं असतं तेव्हा मी स्वत: आणि आशुतोष शर्मा सर्वात प्रभावी ठरतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि मी कर्णधार म्हणून निर्णय घेतला. उपांत्य फेरीत संघाने निर्णय काहीही घेतला तर त्याचा भुर्दंड पराभवातून भरावा लागला आहे. हा पराभव क्रीडाप्रेमींच्या खूपच जिव्हारी लागला आहे. कारण आयपीएलमध्ये भरीव कामगिरी करणारे खेळाडू इतक्या निष्काळजीपणे कसे खेळू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.