
संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या काळातील एक महिला संत म्हणजे संत प्रेमाबाई. संत प्रेमाबाई यांचा जन्म-मृत्यू याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी उपलब्ध पुराव्यांनुसार त्यांचा काळ इ.स. 1658 समजला जातो. गोदावरी नदीकाठच्या एका गावामध्ये राहत असत. त्यांचे बालपण व वैवाहिक जीवनाचा फारसा तपशील सापडत नाही. पण संसारी जीवनाचे काही उल्लेख सापडतात.
लहानपणापासून ईश्वरभक्तीकडे त्यांचा ओढा होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत सत्त्वसंपन्न होते. त्यांची भक्ती अनन्यसाधारण होती. त्या नित्य गोदावरी स्नान, हरिकीर्तन, विठ्ठलभक्ती भागवत-श्रवण करीत असत. यामुळेच त्यांच्याकडे नित्याने साधू-संत, वैष्णवजन घरी जेवणास येत असत. भूतदया हा भाव त्यांच्या ठायी सामावलेला असल्याने प्रवचन, किर्तनास त्या बसल्या की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असत. यामुळेच त्यांना संतसज्जनांनी ‘प्रेमाबाई’ हे नाव ठेवले होते. संत प्रेमाबाईंची बरीच पदरचना केली असावी, असा अंदाज आहे. परंतु सध्या त्यांची तीनच पदे उपलब्ध आहेत. महिपतीबुवा ताहराबादकर यांच्या ‘भक्तलीलामृत’ या चरित्रग्रंथात 42व्या अध्यायात त्यांचे पद्य स्वरूपात अल्प चरित्र आलेले आहे. संत प्रेमाबाईच्या नावावर ज. रा. आजगावकर यांनी तीन- चार पदे शोधली.







