नवलच! टोळांची टोळी!
Marathi November 23, 2025 12:25 PM

>> अरुण

निरुपद्रवी ‘चतुरां’विषयी आपण वाचलंय. या वेळी उपद्रवी टोळांच्या टोळींबद्दल थोडसं जाणून घेऊ. ‘टोळ’ समूहाने उडतात. त्यावरूनच कदाचित ‘टोळी’ शब्द आला असावा. इंग्लिशमध्ये त्यांना ‘ग्रासहापर’ म्हटलं जातं. मात्र ते झुंड किंवा थव्याने उडायला लागले की, त्यांना ‘लाकस्टस’ असं नाव मिळतं. उभी पिकं काही तासांत फस्त करणारी टोळधाड येते त्याला ‘लाकस्ट’ म्हटलं जातं. ही टोळधाड लक्षावधी टोळांची असते. काही ठिकाणी ती एवढय़ा प्रचंड प्रमाणात येते की, सूर्य तळपत असला तरी ढगाळ वातावरणाप्रमाणे त्यांची सावली पडते. अशा या पिकांचे शत्रू असणाऱया टोळांची उत्पती 25 कोटी वर्षांपूर्वीची आहे.

पुढचे पाय काहीसे आखुड आणि मागचे भरभक्कम असणारा टोळ त्याच्या कम्पाऊंड (संयुक्त) डोळय़ांनी सर्वत्र पाहू शकतो. त्यांना पोटाखाली असणाऱया ‘टायपानम मेम्ब्रेन’द्वारे स्पंदनातून ‘ऐकू’ येतं. टोळांच्या 11 हजार प्रजाती आहेत. त्यातली ‘आक्रिडाइडा’ प्रजाती प्रबळ आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका ही त्यांची मुख्य वसतीस्थानं. बहुतेक ‘पालिफेगस’ टोळ मंडळी झाडांची पाने, पिकातले दाणे आणि सूक्ष्म कीटक खाऊन जगतात.

दोन सर्वदर्शी ‘संयुक्त’ (कम्पाऊंड) नेत्रांस, टोळांच्या डोक्याच्या पुढच्या भागावर आणखी तीन डोळे (आासेली) असतात. ते त्यांना प्रकाशाची जाणीव करून देतात. टोळ मागच्या भक्कम पायांवर जोर देऊन ‘उडी’ मारतात. म्हणूनच त्यांना ‘हापर’ म्हणतात. ते मीटरभर लांबउडी घेऊ शकतात. टोळांचं वजन सुमारे 100 मिलीग्राम ते 280 मिलीग्राम इतकं असतं.

पिकांवर टोळधाड आली की, काही पक्षी टोळांना भक्ष्य करतात. परंतु लाखोंच्या संख्येने आलेली टोळधाड कोटय़वधी रुपयांचं धान्य काही तासांत फस्त करतात. टोळांना आपल्याकडे नाकतोडा असंही म्हटलं जातं. आपल्या देशात 1926 ते 31 या काळात अनेक टोळधाडी आल्या होत्या आणि त्या काळातील 10 कोटी रुपयांचं धान्य नष्ट झालं होतं. 2020 च्या एप्रिल ते आागस्टमध्येही उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांत अनेक टोळधाडी आल्या. त्यावर उपाय म्हणून 3 लाख हेक्टर शेतात आधीच इशारा देण्यात आला आणि मालाथिअनसारख्या कीटकनाशक द्रव्यांचा वापर केला गेला. चीनच्या येनान प्रांतातही अशा टोळधाडीने 2020 मध्ये हैदोस घातला होता!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.