धनवंती हर्डीकर-editor@esakal.com
मराठी साहित्यात आस्वादक समीक्षेची विपुलता आहे, पण भाषाशास्त्रीय किंवा शैलीवैज्ञानिक दृष्टिकोनातील समीक्षा अपवादानेच केल्याचे दिसते. ‘‘तुलना’ आणि एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी’ या पुस्तकात डॉ. रमेश धोंगडे यांनी गेल्या पंचवीस वर्षांत प्रकाशित झालेल्या निवडक मराठी कादंबऱ्यांचा आधुनिक भाषाविज्ञान आणि शैलीविज्ञानाच्या अंगाने वेध घेतला आहे.
प्रसिद्ध लेखक-नवीन लेखक, स्त्री साहित्यिक-पुरुष साहित्यिक, भौगोलिक परिसर अशा निकषांच्या आधारे एकूण वीस प्रातिनिधिक कादंबऱ्या त्यांनी त्यासाठी निवडल्या आहेत. त्या त्या कादंबरीत ‘तुलना’ या तंत्राचा कुठे आणि कसा वापर केला आहे, याची सविस्तर नोंद घेऊन त्यांनी शेवटी सध्याच्या मराठी कादंबरीविश्वाविषयीची काही निरीक्षणे मांडली आहेत. मुख्य म्हणजे साहित्यिक समीक्षेचा एक मापदंड म्हणून कादंबरीत वापरलेल्या तुलनांचे विश्लेषण कसे वापरता येते, हे या पुस्तकात त्यांनी स्पष्ट केले आहे.
Premium| The Chronicle Project: फ्लेम विद्यापीठात 'द क्रॉनिकल प्रोजेक्ट'ची सुरुवात, भारतातील जिल्ह्यांचे सखोल दस्तावेजीकरण ज्ञानाचे भंडार उघडे करणारआधुनिक भाषाशास्त्र, मानसशास्त्र आणि बोधात्मक अभ्यासांत ‘तुलना’ या बाबीला उपमा, उत्प्रेक्षा, रूपक असा केवळ एक शब्दालंकार न समजता तिचा आणखी व्यापक अर्थाने विचार केला जातो. भाषा या जीवशास्त्रीय देणगीचा वापर माणसे फक्त परस्परसंवादासाठी नाही, तर कल्पना करण्यासाठीही करतात. दोन गोष्टींतील साम्य ओळखून त्यांची तुलना करणे हा कल्पनाशक्तीचाच भाग आहे. तुलना करताना माणूस आपल्या आधीच्या अनुभवाचे संदर्भ लावून, त्या ‘अनुभव जाळी’तून नवा अनुभव पाहतो. त्याची स्वतःची दृष्टी आणि प्रतिभा यांची स्वाभाविक चौकट या प्रक्रियेला असते. साहित्यिकांनी आपल्या कलाकृतीत वापरलेल्या विविध तुलनांमधे त्यांच्या एकंदर अनुभवविश्वाचे, सांस्कृतिक संचिताचे, प्रतिभाविलासाचे प्रतिबिंब असते. तुलना जितक्या अधिक नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, कल्पक तितके ते प्रतिबिंब अधिक समृद्ध, प्रभावी आणि काव्यात्म. कलाकृतीचे एकंदर साहित्यिक मूल्य जोखण्यासाठी त्या तुलनांचे विश्लेषण हा एक महत्त्वाचा निकष ठरतो. मराठी कादंबऱ्यांचे असे सविस्तर विश्लेषण प्रथमच करण्याचे श्रेय डॉ. धोंगडे यांना द्यावे लागेल.
पुस्तकाच्या सुरवातीला डॉ धोंगडे यांनी त्यामागील सैद्धांतिक भूमिका मांडली आहे. त्यात पाश्चात्त्य आणि भारतीय या दोन्ही प्रदीर्घ परंपरांचा त्यांनी विचार केला आहे, हे विशेष म्हणावे लागेल. त्यानंतर त्यांनी या समीक्षेसाठी वापरलेली ‘विश्लेषण सामग्री’ नोंदवली आहे. त्यांनी आणि त्यांचे साहाय्यक डॉ. दिलीप धोंडगे आणि डॉ. संदीप कदम यांनी निवडलेल्या सर्व कादंबऱ्यांतील सर्व तुलनांची नोंद केली आणि त्या सर्व शब्दांचे किंवा बाबींचे (एकूण १६५७) विविध अर्थ-क्षेत्रांमधे वर्गीकरण केले. मुख्य अर्थ-क्षेत्रे आणि उपक्षेत्रे धरून त्यांची संख्या ६० च्या आसपास भरते. सुप्रसिद्ध ‘रॉजेट’ थिसॉरसमधील अर्थ-क्षेत्रांची संख्या १००० च्या आसपास आहे, हे लक्षात घेता या कादंबऱ्यांतील तुलनांमधे अर्थ-क्षेत्रांचे वैविध्य फारच मर्यादित आहे असे या विश्लेषणात दिसून येते. डॉ. धोंगडे यांनी या अभ्यासासाठी वापरलेला डेटा त्यांनी वेबसाइटच्या माध्यमातून सर्व वाचकांना खुला केला आहे, हे फारच दुर्मिळ आहे. इच्छुकांना हा डेटा पडताळून पाहता येईल आणि पुढील अभ्यासासाठीदेखील वापरता येईल.
या छोटेखानी दिसणाऱ्या पुस्तकातून डॉ धोंगडे यांनी मराठीच्या समीक्षक-वाचक-अभ्यासकांसाठी विचारांचे एक नवीन, व्यापक दालन उघडून दिले आहे. भाषाशास्त्रीय समीक्षेतील एका नव्या वस्तुनिष्ठ साधनाचा परिचय करून देताना त्यांनी त्यासाठी लागणारी परिभाषा म्हणजे नवीन संकल्पनांसाठी लागणाऱ्या नव्या मराठी संज्ञाही उपयोगात आणल्या आहेत, ही त्यांनी मराठीला दिलेली देणगीच आहे.
पुस्तकात त्यांनी केलेल्या विवेचनात पाल्हाळ नाही, मात्र बराच भाग अगदी सूत्ररूप वाटावा इतक्या संक्षेपाने आला आहे. विशेषतः सैद्धांतिक चर्चेचा भाग अधिक विस्ताराने दिला किंवा त्यातील व्याकरणिक, भाषाशास्त्रीय संज्ञांचे स्पष्टीकरण सुलभ संदर्भासाठी पुस्तकातच अन्यत्र दिले, तर सर्वसाधारण अभ्यासकांना, वाचकांना पुस्तक समजणे सोपे जाईल.
स्वागत नव्या पुस्तकांचेमराठीच्या विद्यार्थ्याना, समीक्षकांना नवी दिशा देणारे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर सर्जनशील लेखन करू इच्छिणाऱ्यांनीदेखील आपल्या अभिव्यक्तीचा कस वाढवण्यासाठी ‘तुलना’ या संदर्भातील हा नवा विचार समजून घेणे फायद्याचे ठरेल.