दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या वनडे मालिकेसाठी उपकर्णधाराची निवड करण्यात आलेली नाही. यामागील कारण बीसीसीआयने सांगितलेले नाही. मात्र केएल राहुल जर दुखापतीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे संघाबाहेर पडला तर संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील वनडे मालिकेत श्रेयस अय्यर भारताचा उपकर्णधार होता. मात्र दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर पडलेला आहे. त्याच्या जागी तिलक वर्माला भारतीय संघात जागा मिळाली आहे. त्याचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. तर शुभमन गिलच्या जागी यशस्वी जैस्वालला सलामीला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे ज्येष्ठ खेळाडूही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली होती. रवींद्र जडेजाही वनडे क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र जसप्रीत बुमराहला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आलेली आहे. जर या मालिकेत केएल राहुल जखमी झाला तर त्याच्या जागी ऋषभ पंत संधाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तसेच रोहित शर्माकडेही ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला वनडे सामना 30 डिसेंबर रोजी रांची येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी रायपूर येथे दुसरा सामना रंगणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल