भारतीय महिला क्रिकेटस्टार स्मृती मानधना हीचा विवाह पलाश मुच्छल यांच्याशी सांगलीत होणार होता. परंतू तिचे वडील श्रीनिवास मानधना यांना हार्ट अॅटक आल्याने त्यांचा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.त्यामुळे क्रिकेट स्टार स्मृती मानधना हीच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत असताना आता स्मृती हीचा होणारा पती पलाश मुच्छल याचीही प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे.
स्टार खेळाडू स्मृती मानधना हीच्या विवाहाची चर्चा गेली अनेक दिवस सुरु आहे. स्मृतीच्या विवाहाला शुभेच्छा देण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट पटूंनी एक रिल्सही तयार करुन व्हायरल केल्याने स्मृतीचा विवाहाची आतुरता तिच्या चाहत्यांना लागली होती. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह आज सांगलीत होणार होता. परंतू विवाहाच्या काही तास आधीच स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर वडीलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी स्मृती मानधना हीने हा विवाह पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.
स्मृतीचा विवाह पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्यामुळे चाहत्यांनी तिच्या वडीलांची प्रकृती नीट होण्यासाठी प्रार्थना केली. त्याच दरम्यान पलाश मुच्छल यांची तब्येत बिघडली असल्याचे वृत्त आहे. पलाश मुच्छल यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पलाश हॉटलेवर रवाना झाले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन आणि पित्त वाढल्याची तक्रार केल्याने त्यांच्यावर उपचार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पलाश यांची प्रकृती आता बरी असल्याचे म्हटले जात आहे.
स्मृतीची वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आणखी एक ते दोन दिवस देखरेखेखाली ठेवावे लागणार असल्याचे डॉक्टर नमन शाह यांनी सांगितले आहे. श्रीनिवास मानधना यांच्यावर सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली दोन ते तीन दिवस राहावे लागणार आहे. पुढील तपासणीनंतर त्यांच्यावर कदाचित अँजिग्राफी करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्याच्या घडीला त्यांचे प्रकृती स्थिर असून शारीरिक ताण – तणावामुळे त्यांना हा हृदय विकाराचा झटका आल्याचे डॉक्टर नमन शहा यांनी म्हटले आहे.