Hingoli Bank Account Scam: दहा हजारांसाठी बॅंक खाते भाडेतत्त्वावर ऑनलाइन बेटिंगसाठी वापर, हिंगोलीत सहा महिन्यांपासून गोरखधंदा
esakal November 24, 2025 03:45 AM

हिंगोली : अवैध ऑनलाइन बेटिंग आणि लाखो रुपयांच्या व्यवहारांसाठी अनेक बँक खातेधारकांना १० हजारांचे आमिष दाखवून त्यांचे खाते भाडेतत्त्वावर घेण्यात आले. राजस्थानातील दोघे हिंगोलीत ६ महिन्यांपासून हा गोरखधंदा चालवत होते.

शिरडशहापूर येथील तरुणानेही आपले बँक खाते भाडेतत्त्वावर दिले होते. त्याला तेलंगणा पोलिसांची नोटीस आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात राजस्थानातील दोघा संशयितांनी २१ जणांची फसवणूक केली. त्यांच्या बँक खात्यांमधून महिनाभरात ५४ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती हिंगोली पोलिसांनी दिली आहे.

Cyber Scam: ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये गमावले दोन कोटी; निवृत्त बँक व्यवस्थापक आणि पत्रकारांचे वडील फसले

मनोज शर्मा (रा. हमीरगड, राजस्थान), प्रल्हाद स्वालका (रा. चंदोरिया, राजस्थान) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. ते काही दिवसांपूर्वी वसमत येथे आले होते. दोघांची मनोज स्वामी (शिरडशहापूर, जि. हिंगोली) या तरुणाशी ओळख झाली.

या ओळखीतून त्यांनी मनोजला बँक खात्यात होणाऱ्या व्यवहारांवर दरमहा १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी मनोज याच्या बँक खात्यामार्फत व्यवहार सुरू केले. या व्यवहारात मनोजला काहीही न करता दरमहा १० हजार रुपये मिळू लागले. या आमिषाला बळी पडल्याने वसमतचा तरुण अडचणीत सापडला. तेलंगणा पोलिसांची नोटीस आल्यानंतर त्याने ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

सूत्रधाराची १० बँक खाती फ्रीज

सूत्रधार स्वालका याची १० बँक खाती फ्रीज आहेत. त्यामुळे त्याने इतरांची बँक खाती वापरण्यास सुरवात केली होती. खातेदाराला ५ हजारांचे आमिष दिले जाई, गरजू तरुण बळी पडत. मोठे व्यवहार लक्षात आल्यानंतर बँका अशी खाती गोठवत. त्यानंतर ते दुसरे सावज हेरत असत. दरम्यान, संशयितांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल आहेत. स्वालकावर गुरगाव (हरियाणा) येथे पहिला गुन्हा दाखल झाला. दोघांचीही सर्वच मोठ्या बँकांमध्ये खाती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Nashik Crime : नाशिकमध्ये एमडीचा अड्डा! पुणे महामार्गावरील हॉटेलमध्ये छापा, सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलासह तिघे गजाआड अशी आहे मोडस ऑपरेंडी

संशयित शर्मा व स्वालका यांनी अनेकांशी संपर्क साधला. काही जणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे खाते चालवण्यासाठी घेतले होते.

संशयित ऑनलाइन बेटिंग करून त्याद्वारे आलेला पैसा हिंगोलीतील मनोज स्वामी याच्या खात्यावर जमा करून त्याद्वारे बिटकॉइन खरेदी करीत होते.

राजस्थानातील या संशयितांनी गेल्या महिनाभरात २१ नागरिकांच्या खात्यातून अशा पद्धतीने ५४ लाख रुपयांचे व्यवहार केले.

या व्यवहारातून त्यांनी बिटकॉइन खरेदी केले आहेत. याशिवाय त्यातून एक कारही खरेदी केली असून त्या कारमध्ये बसूनच ते ऑनलाइन व्यवहार करत होते.

खाते भाडेतत्त्वार का घेतले?

अवैध बेटिंग व अन्य खेळांसाठी अशा खात्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठे व्यवहार झाल्यास आयकरची नोटीस संबंधित खातेधारकाला जाते. तसेच क्रिप्टो करन्सी विकत घेण्यासाठी अशा खात्यांचा वापर होतो. त्यावर लागणारा कर संबंधित खातेधारकाकडून वसूल केला जातो, सूत्रधार पडद्याआड राहतात.

अनोळखी व्यक्तीला आपली माहिती देऊ नये. मोबाइलवरील ओटीपी देऊ नये. अनोळखी ॲप डाऊनलोड करू नये. खात्याचा तपशीलही गुप्त ठेवावा.

- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.