मनासाठीही लागतो वर्कआउट! मानसिक ताकद, स्थिरता आणि लवचिकता वाढवण्याचा नवा मंत्र
esakal November 24, 2025 04:45 AM

शलाका तांबे

आपण नेहमी शरीराचे स्नायू मजबूत असावे, याविषयी बोलतो. व्यायाम, योग, चालणे, योग्य पोषण यांनी स्नायू बळकट होतात. पण शरीराच्या स्नायूंसारखेच आपल्या मनालाही स्नायू असतात. ते दिसत नाहीत, पण रोज ते आपल्याला, आपल्या मनाला सांभाळून ठेवतात.

शरीरातले स्नायू जसे आपल्या शरीराला संतुलन, लवचिकता, ताकद देतात, तसेच मनाचे स्नायू मजबूत झाले की ते मनाला याच तीन गोष्टी देतात. मनाचे स्नायू म्हणजे मनाचे गुण आणि मनाच्या क्षमता. कोणताही गुण किंवा क्षमता वाढवायची असेल तर त्यांना बळ द्यावे लागते. मनाचेदेखील तसेच आहे.

मन सक्षम, स्थिर करायचे असेल तर मनाच्या काही खास गुणांना, म्हणजेच काही खास स्नायूंना अधिक बळकट करायला हवे. मनाचे ५ महत्त्वाचे स्नायू कोणते आणि त्यांना कसे मजबूत करावे, ते पाहू- संयम थांबण्याची ताकद आजच्या वेगवान जगात संयम राखणे म्हणजे जणू एक ‘सुपरपॉवर’ आहे.

वाहतुक कोंडी, एखादा अपेक्षित मेसेज, ई-मेल उशीरा येणे, मुलांची किरकिर व हट्ट, त्यांचा अभ्यास, मीटिंग्ज अपेक्षेनुसार न होणे, सहकाऱ्यांकडून कामात विलंब, गोष्टी मनासारख्या न घडणे, अशी अनेक आव्हाने रोज येतात. या प्रत्येक ठिकाणी

संयमाची परीक्षा होते. संयम म्हणजे फक्त थांबणे नाही, तर थांबून मन शांत ठेवणे. संयम हा स्नायू मजबूत करायचा असेल तर, श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा सराव केला पाहिजे. हा सराव आपल्याला ते आव्हान समोर सताना करायचा आहे. ‘डीप ब्रीदिंग’ म्हणजे जाणीवपूर्वक खोल श्वास घेणे. त्याने विचारांची आणि भावनांची गती कमी होते आणि आपण हळूहळू संयम ठेवायला शिकतो.

एकाग्रता चित्त एका ठिकाणी केंद्रित करण्याची कला आपले मन दिवसभर इथे-तिथे धावते. कामे, फोन, समाजमाध्यमे, जुन्या आठवणी, काळजी, प्लॅनिंग, अशा अनेक ठिकाणी मन धावत असते. एकाग्रता म्हणजे मनाला एका जागी बसायला शिकवणे. कामात, अभ्यासात, नात्यांत, संभाषणात, आपले मन एकाग्र असणे आवश्यक असते. एका वेळी एकाच कृतीत, एकाच संभाषणात, एकाच विचारवर मन एकाग्र ठेवण्यासाठी एकाग्रतेचा स्नायू बळकट करावा लागतो. एकाग्रतेचा अगदी योग्य अर्थ म्हणजे- ‘वन पॉईंटेड फोकस’.

मन सतत चंचल, विचलित असले, तर आपला हा संयमाचा स्नायू कधी मजबूत होत नाही. या स्नायूला बळकट करण्यासाठी रोज एक तरी काम अगदी एकाग्रचित्ताने करा. धैर्य भीती असूनही पुढे जाण्याची शक्ती धैर्य म्हणजे भीती नाही असे नाही. भीती असूनही पुढे जाणे हे खरे धैर्य. नवीन काम सुरू करणे, आपले मत स्पष्टपणे मांडणे, आपली चूक मान्य करणे, तणावाला सामोरे जाणे, या सगळ्यात मनाचा धैर्याचा स्नायू लागतो. धैर्य स्नायू मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने एक-एक गोष्ट अशी करावी, जी आपण करायला थोडे भितो.

मग ते मीटिंगमध्ये एखादा नवीन मुद्दा मांडणे असो, आपले विचार प्रकट करणे असो किंवा कोणाशी प्रामाणिक संवाद साधणे असो. अशा छोट्या छोट्या सरावामधूनच आपले धैर्य वाढत असते. करुणा दुसऱ्याच्या मनात डोकावण्याची क्षमता करुणा म्हणजे फक्त दया नाही, तर समोरच्याचे जग समजून घेण्याची कला. दुसऱ्यांबद्दल संवेदनशील असणे. आजच्या समाजात हा स्नायू जास्त गरजेचा झाला आहे. संवेदनशील वातावरणात लोक सहज बोलतात, चूक घडली तरी सुधारतात आणि त्यानेच एकमेकांमध्ये विश्वास वाढतो.

करुणा नसेल तर गैरसमज वाढतात आणि संबंध ताणले जातात. करुणा नात्यांना मजबूत करते. या स्नायूस मजबूत करायचे असेल, तर ‘समोरचा काय म्हणतोय?’ यापेक्षा ‘तो तसे का म्हणतोय?’ हे जाणून घ्यायला हवे. शिस्त वरील सगळ्या स्नायूंना जर खरोखरीच मजबूत करायचे असेल आणि मनाला सक्षम करायचे असेल तर मनाला शिस्त लावावी लागते. फक्त सातत्याने केलेली कृतीच योग्य बदल घडवते. शरीराची शिस्त- उदा. वेळेवर उठणे, योग्य आहार, व्यायाम. तर मनाची शिस्त म्हणजे वेळेवर थांबणे, योग्य निर्णय घेणे, सातत्य ठेवणे. हे दोन्ही एकत्र आले की जीवनात सुंदर बदल दिसू लागतात.

Women’s Health Crisis: हिमोग्लोबिन, अॅनिमिया, उच्च रक्तदाब व मधुमेहाचे निदान; महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन

त्यासाठी आपल्या मनाचे एक ‘फ्रेमवर्क’ (जडणघडण) तयार करावे लागते. ते जणू आपल्या मनाचे ‘जिम’ असते. तिथे छोट्या सवयींचे नियमित पालन, सातत्य आणि स्वनियमन महत्त्वाचे असते. संयम, एकाग्रता, धैर्य, करुणा आणि शिस्त हे मनाचे पाच मजबूत आधारस्तंभच आहेत. म्हणून ‘मानसभान’ ठेवून मनाच्या या स्नायूंना बळकट करूया.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.