राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे, आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार देखील घालण्यात आला होता. मात्र हे सर्व नाराजीनाट्य सुरू असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आह. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत शिल्पा वाडकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर हा मोठा झटका मानला जात आहे. शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता, त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. शिल्पा वाडकर यांचा प्रवेश सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाची नाराजी
दरम्यान भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्यानं आता शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीनंतर देखील भाजपात प्रवेश सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता, तर शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.