वर्धापनदिन इस्टेट लेख
---
स्मार्ट सिटीचा पाया
पिंपळे सौदागर
पिंपरी चिंचवड शहराचा वेगाने विकास होत आहे. समाविष्ट गावांमध्ये गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. यातील पिंपळे सौदागर भाग जवळपास पूर्णतः विकसित झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या भागाचा समावेश झाला आहे. त्यामुळे सेवानिवृत्तांसह आयटीयन्सही या भागाला राहण्यासाठी पसंती दिली आहे. शांत परिसर म्हणून याची ओळख आहे. मध्यमवर्गीयांनीही या भागाला पसंती असून स्मार्ट सिटीमुळे स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. कारण, या भागाचा चेहरा मोहरा बदलला आहे.
- पीतांबर लोहार
भो सरी- नाशिक फाटा- वाकड बीआरटी रस्ता पिंपळे सौदागरमधून गेला आहे. प्रस्तावित निगडी- किवळे- पुनावळे- ताथवडे- वाकड- भोसरी- मोशी- चाकण मेट्रो मार्गही पिंपळे सौदागरमधून दर्शविला आहे. नियोजनबद्ध विकास, तंत्रज्ञानाचा उपयोग, हरित संकल्पना आणि महापालिकेसह लोकसहभाग यामुळे येथील रस्ते, सार्वजनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय बदल घडले आहेत.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत पिंपळे सौदागरचा समावेश करण्यात आला. या माध्यमातून व्यापक स्वरूपात नियोजन करून नागरिकांना उत्तम जीवनमान देणारे, दीर्घकाळ टिकाऊ, डिजिटल माध्यमांना प्राधान्य देणारे आणि नागरिक केंद्रित सुविधांनीयुक्त उपनगर अशी पिंपळे सौदागरची ओळख निर्माण झाली आहे.
तीन स्तरावर विकास
स्मार्ट सिटी अंतर्गत शाश्वत विकास, स्मार्ट तंत्रज्ञान आणि नागरिकांसाठी सेवांचे डिजीटायझेशन अशा तीन स्तरांवर पिंपळे सौदागरचा विकास होताना दिसतो आहे. यामध्ये ऊर्जेची बचत, पावसाचे पाणी व्यवस्थापन, सोलर प्रोजेक्ट्स, हरित वाहतूक, प्रदूषण नियंत्रण; डिजिटल डिस्प्ले, स्मार्ट किऑस्क, वाय-फाय, सेन्सर-आधारित तंत्रज्ञान, सीसीटीव्हींचे जाळे; म्युनिसिपल ई-क्लासरूम, सिटी नेटवर्क ॲप, ई-मॉड्यूल्स व फास्ट सर्व्हिस डिलिव्हरी आदी बाबींचा समावेश विकास कामांमध्ये आहे. त्याची अनुभूती पिंपळे सौदागरच्या प्रत्येक रस्त्यावर, चौकात आणि सार्वजनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात दिसत आहे.
स्मार्ट सुविधांची उपलब्धता
सोलर पॉवर जनरेशन प्रकल्प, बायसिकल शेअरिंग सिस्टीम, म्युनिसिपल स्मार्ट ई-क्लासरूम्स, स्मार्ट रोड्स विथ वॉकवे व पदपथ, सायकल जंक्शन डिझाईन, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज नेटवर्क, सेवर नेटवर्क, स्मार्ट शौचालये, पार्किंग, स्मार्ट बस स्टॉप्स, स्मार्ट डिजिटल डिस्प्ले, स्मार्ट किऑस्क मशिन, सिटी नेटवर्क आणि मर्चंड मॉड्युल ॲप अशा सुविधा उपलब्ध आहेत.
स्मार्ट रस्त्यांचा समावेश
पिंपळे सौदागरमधील रस्ते स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण केले आहेत. मुख्य रस्ता, पदपथ, सायकल मार्ग अशी त्यांची रचना आहे. पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी पदपथ अधिक रुंद केले आहेत. युनिफाईड स्ट्रीट डिझाईन अंतर्गत प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुटसुटीत पदपथ, दिव्यांगांसाठी रॅम्प, सायकल ट्रॅक, झाडांची ओळ, ड्रेनेज यांचे नियोजन केले आहे. एलईडी स्मार्ट लाइटिंगमुळे वीज बचत होत आहे. विविध सेवा वाहिन्या भूमिगत असल्यामुळे सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे. रस्त्यांच्या कडेला झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत उभारलेली स्मार्ट टॉयलेट्स ही विशेष ओळख झाली आहे. कारण, त्यामध्ये स्वयंचलित साफसफाई प्रणाली आहे. सेन्सर-आधारित फ्लश, रिअल-टाइम मॉनिटरिंग, ॲपद्वारे माहिती, दिव्यांगांसाठी सुलभस पेमेंट किऑस्कची सुविधा आणि हात धुणे व सॅनिटायझर केले जात आहे. स्मार्ट बस स्टॉप करण्यात आले आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मोफत वायफाय सुविधा, युएसबी चार्जिंग पॉइंट दिले आहे. आरामदायी आसन व्यवस्था, दिव्यांगांसाठी विशेष डिझाइन आणि नियमित स्वच्छता व देखभाल केली जात आहे.
स्मार्ट डिस्प्ले
नागरिकांच्या सोईसाठी स्मार्ट डिजिटल डिस्प्ले बसविले आहेत. यामुळे वाहतूक स्थिती कळते. बसचे वेळापत्रक, महापालिकेच्या विविध सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन अलर्ट आणि हवामान अंदाज कळत असल्याने डिस्प्लेमुळे शहराला ‘रिअल टाइम कनेक्टिव्हिटी’ मिळाली आहे. त्यातच स्मार्ट किऑस्कची साथ मिळाली आहे. कारण, सर्व सेवांचे डिजिटायझेशन केले आहे. किऑक्स यंत्रणेमुळे मिळकतकर माहिती, जन्म-मृत्यू दाखले, कम्युनिटी हॉल बुकिंग, तक्रार नोंदणी, विविध बिलांचे पेमेंट, शैक्षणिक ई-क्लासरूम माहिती, नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. सिटी नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात हाय-स्पीड फायबर नेटवर्क दिले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मोठा क्लस्टर असून, डेटा सेंटरद्वारे रिअल टाइम मॉनिटरिंग, ट्रॅफिक व्यवस्थापन केले जात आहे.
पिंपळे सौदागरची काही वैशिष्ट्ये
- स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित ‘नवा चेहरा’
- रस्ते रुंद, सुरक्षित आणि सुंदर
- स्वच्छता व सार्वजनिक सुविधा दर्जेदार
- वाहतूक नेटवर्क स्मार्ट आणि सुटसुटीत
- डिजिटल सुविधा प्रत्येक वॉर्डमध्ये उपलब्ध
- हरित विकासाला प्रोत्साहन
- पावसाळ्यातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा
- व्यापाऱ्यांसाठी डिजिटल प्रगतीचे दरवाजे खुले
....