बीसीसीआय निवड समितीने रविवारी 23 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शुबमन गिल याच्या दुखापतीमुळे केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर आता बांगलादेशने मायदेशात आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. बीसीबीने (Bangladesh Cricket Board) आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. लिटन कुमार दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर सैफ हसन उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. हसनची नुकतीच उपकर्णधापदी नियुक्ती करण्यात आली होती.
बीसीबी निवड समितीने मोहम्मद सैफुद्दीन आणि महिदुल इस्लाम अंकोन या दोघांना संधी दिली आहे. या दोघांना तस्किन अहमद आणि शमीम हुसैन यांच्या जागी संघी देण्यात आली आहे. तस्किन आणि शमीम या दोघांचा गेल्या महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी समावेश करण्यात आला होता. मोहम्मद सैफुद्दीन याआधी अफगाणिस्तान विरुद्ध टी 20i मालिकेत खेळला होता. तसेच अंकोन याला टी 20i क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही. अंकोनने आतापर्यंत बांगलादेशचं 1 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.
बांगलादेश-आयर्लंड, पहिला सामना, 27 नोव्हेंबर, चट्टोग्राम
बांगलादेश-आयर्लंड, दुसरा सामना, 29 नोव्हेंबर, चट्टोग्राम
बांगलादेश-आयर्लंड, तिसरा सामना, 2 डिसेंबर, ढाका
दरम्यान बांगलादेशने याआधी आयर्लंडचा कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला होता. बांगलादेशने पहिल्या सामन्यात डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला होता. तर बांगलादेशने दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडवर 217 धावांनी मात केली होती.
पहिल्या 2 टी 20I सामन्यांसाठी बांग्लादेश टीम : लिटन दास (कर्णधार), सैफ हसन (उपकर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, नुरुल हसन, महिदुल इस्लाम अंकोन, मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, शरीफुल इस्लाम आणि मोहम्मद सैफुद्दीन.