रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी पुन्हा एकदा वनडे सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. रोहित आणि विराट दोघेही अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत खेळले होते. भारताचा या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने चाबूक भागीदारी करत भारताला विजयी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे दोघे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत.
तसेच या मालिकेत टीम इंडियाचा युवा आणि स्टार ओपनर यशस्वी जैस्वाल हा देखील खेळताना दिसणार आहे. यशस्वी या मालिकेत ओपनिंग करणार असल्याचं निश्चित आहे. तसेच दुखापतीमुळे भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल याला वनडे सीरिजला मुकावं लागलं आहे. त्यामुळे यशस्वी आणि रोहित हे दोघेही ओपनिंग करणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. मात्र श्रेयस अय्यर याच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्न आता क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती. श्रेयसला या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी देण्यात आली नाही.