भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी 23 नोव्हेंबरला भारतीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या एकदिवसीय (IND A vs SA A Unofficial Odi Series 2025) मालिकेत गोलंदाजांना चोपणाऱ्या ऋतुराज गायकवाड याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये 200 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे ऋतुराजला सिनिअर टीममध्ये संधी मिळाली. ऋतुराजच्या कमबॅकमुळे टीम इंडियापासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉ याला लवकरच लॉटरी लागणार आहे. पृथ्वीला थेट नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी शॉ याला आगामी सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेतील साखळी फेरीत नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. ऋतुराज आणि पृथ्वी दोघेही महाराष्ट्र क्रिकेट टीमचं प्रतिनिधित्व करतात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने (MCA) शुक्रवारी 21 नोव्हेंबरला सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी ऋतुराज गायकवाड याला कर्णधार करण्यात आलं. मात्र आता ऋतुराजची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीला ऋतुराजच्या अनुपस्थितीत साखळी फेरीत महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी मिळणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एमसीएने शुक्रवारी महाराष्ट्र संघाचा उपकर्णधार म्हणून कोणत्याही खेळाडूचं नाव जाहीर केलं नव्हतं. मात्र आता एमसीएच्या सूत्रांनुसार, पृथ्वीला नेतृत्व मिळू शकतं.
रिपोर्ट्सनुसार, पृथ्वीला एमसीए निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटने गरज पडल्यास नेतृत्व करावं लागेल अशी आधीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. तसेच पृथ्वीला नेतृत्वासाठी तयार राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं.
पृथ्वीला नेतृत्वाचा अनुभव आहे. पृथ्वीने त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाला अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच पृथ्वी स्वत: ओपनर आहे. त्यामुळे पृथ्वीला संधी मिळाल्यास त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल. तसेच पृथ्वीला याद्वारे आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी दावा मजबूत करण्याची संधी मिळेल. पृथ्वी गेल्या हंगामात अनसोल्ड राहिला होता.
पृथ्वी अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र संघासह जोडला गेला. पृथ्वीने महाराष्ट्रकडून खेळताना रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 7 डावांमध्ये 470 धावा केल्या. पृथ्वीने या दरम्यान 1 द्विशतक आणि 3 अर्धशतकं झळकावली. त्यामुळे टीम मॅनेजमेंटला पृथ्वीकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.