हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी जुहू इथल्या निवासस्थानी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गुरुवारी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेला देओल कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
शोकसभेनंतर भावूक झालेल्या हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 'काही सुंदर कौटुंबिक क्षण. मौल्यवान फोटो. मला माहीत आहे की या फोटोंचा एक मोठा संच आहे, पण हे कधीच प्रकाशित झालेले नाहीत. हे फोटो पाहताना माझ्या भावना उलगडत आहेत', असं त्यांनी फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या तीन दिवसांनंतर हेमा मालिनी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर पोस्ट लिहित धर्मेंद्र माझ्यासाठी सर्वस्व होते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
हेमा मालिनी यांनी शेअर केलेल्या आठवणींवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सुंदर.. प्रत्येक फोटोमधून भरभरून प्रेम आणि मायेची ऊब दिसतेय', असं एकाने लिहिलं. 'या कठीण काळात स्वत:ला सावरा. एक मार्गदर्शक प्रकाश म्हणून धरमजी कायम तुमच्यासोबत राहतील', असं दुसऱ्याने म्हटलंय.
‘धरमजी.. माझ्यासाठी ते बरंच काही होते. प्रेमळ पती, ईशा आणि अहाना या आमच्या दोन मुलींचे प्रेमळ वडील, मित्र, तत्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी, गरजेच्या वेळी ज्यांच्याकडे हक्काने जाता येईल अशी व्यक्ती.. किंबहुना ते माझ्यासाठी सर्वस्व होते. चांगल्या आणि वाईट काळात त्यांनी कायम माझी साथ दिली’, असं हेमा मालिनी यांनी लिहिलं होतं.