आयटीआयमध्ये संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा
कांदिवली, ता. २७ (बातमीदार) : कांदिवली पश्चिम येथील प्रमुख स्वामी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानावर आधारित विविध निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व माहिती मिळाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयएमसी सदस्य अशोक कांबळे यांनी या निबंध स्पर्धेमुळे मुलांना संविधानाचे महत्त्व कळल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कमलेश केळबाईकर होते, तर गटनदेशक विनोद हाडळ उपस्थित होते. याप्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच देशाच्या एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. याशिवाय असिस्टंट ब्युटीशियन थेरपी कोर्सेस पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन अक्षय मिसाळ यांनी केले. अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.