बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे महात्मा गांधी विद्यालयाच्या स्वयंपाकगृहाला अत्याधुनिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. वाढत्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक शालेय पोषण आहाराची व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी ही महत्त्वपूर्ण मदत केल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी दिली.
फाउंडेशनतर्फे विद्यालयाला दोन लहान शेगड्या, एक मोठी शेगडी, इलेक्ट्रिक फूड वॉर्मर, भाज्या कापण्यासाठीचे टेबल, धान्य साठवणुकीसाठी विशेष स्टँड, भांडी ठेवण्याचे आणि धुण्याचे स्टँड, तसेच दोन स्टील बेसिन अशा एकूण सात आधुनिक स्टँडसह दर्जेदार साहित्य प्रदान करण्यात आले. अशीच मदत भाऊसाहेब परांजपे विद्यालयालाही करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला लायन्स फाउंडेशनचे भारत दत्त, नटवर बंका, राजुल पटेल, सुनील पाठारे, प्रसाद खोपकर, अशोक जगे, सुबोध कालेकर, रेलिया, राकेश तेलवणे, अबोली तेलवणे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित गोडबोले, नयना गुळीक, माधुरी जाधव, माधुरी पुराणिक, राजेश रोहिदास, प्रा. भगवान चक्रदेव, माणिक पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाठारे यांनी, सूत्रसंचालन शिल्पा शेळके यांनी, आभार स्वाती शेटे यांनी मानले.
प्रेरणादायी संदेश
आम्हीही कधी तुमच्यासारखेच बसून ऐकत होतो. उद्या मोठे व्हा आणि शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून या, असा प्रेरणादायी संदेश प्रसाद खोपकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला. शाळांना अद्ययावत करण्यात आवश्यक असलेली कोणतीही मदत करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आश्वासन सुनील पाठारे यांनी दिले.