केडगाव, ता. २७ ः पुणे- सोलापूर महामार्गावरील चौफुला (ता. दौंड) चौकात दररोज होत असलेल्या कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर पीएमआरडीए प्रशासनाने यवतप्रमाणे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चौफुल्यात पुणे- सोलापूर महामार्ग व शिरूर- सातारा महामार्ग एकत्र आले आहेत. त्यामुळे या चौकात नेहमी वर्दळ असते. महामार्ग चारपदरी झाल्यानंतर चौकाचे रुंदीकरण झाले. मात्र, चौकातील हातगाडी, सुपा रस्त्यावरील अरुंद पूल, चुकीच्या पद्धतीने लावलेले दुभाजक यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
चौफुला चौकात पाच मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांच्या रुग्णवाहिका अनेकदा या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत. या कोंडीमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याची प्रशासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
न्हावरा- चौफुला या रस्त्याचे महामार्गात रूपांतर झाले अन् रस्त्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. मात्र, चौफुला चौकाच्या मध्यापर्यंत दुभाजक टाकल्याने रस्ता रुंद होऊनही येथे सतत वाहतूक कोंडी होत आहे. हे दुभाजक हर्ष रुग्णालयापर्यंत काढले तर वाहतूक कोंडी होणार नाही. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या महामार्गावरून उत्तर भारत व दक्षिण भारतात जाणारी येणारी वाहतूक वाढली आहे. हे दुभाजक काढणे व सुपे रस्त्यावरील पुलाचे रुंदीकरण करणे या दोन उपाययोजना केल्यातर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. मुख्य चौकात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालते. त्यामुळे ही कोंडी होत आहे.
पोलिस व ग्रामपंचायतीची टोलवाटोलवी
वाहतूक कोंडी झाल्यानंतर नागरिक पोलिसांना फोन करतात. यवत पोलिस म्हणतात की, चौकातील अतिक्रमण काढणे हे पोलिसांचे काम नाही. ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढावीत.
कोणीही येतो अन् भर चौकात रस्त्यालगत दुकान थाटतो. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणारे हातगाडीचालक व व्यावसायिकांवर पोलिस व महामार्ग टोल प्रशासनाने कारवाई करावी. पोलिसांना मदत करायला आम्ही तयार आहोत. नागरिकांनी फोन केल्यानंतर पोलिस चौकात येतात, मात्र तोपर्यंत अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
- बाळासाहेब सोडणवर, सरपंच, बोरीपार्धी
04077