नगरपालिका निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट
नगराध्यक्ष पदासाठी ३४ तर नगरसेवकांसाठी ५७० उमेदवार रिंगणात
महाड, ता. २७ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकांमधील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपदासाठी ३४ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी ५७० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय पक्षाने आपल्या सोयीनुसार आघाडी व युती केल्याचे चित्र दिसत आहे.
रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुका ३ नोव्हेंबरला होत असून यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आता संपली आहे. नगराध्यक्ष पदांच्या दहा जागांसाठी ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून नगरसेवकांच्या २१७ जागांसाठी ५७० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अनेक ठिकाणी दुरंगी तर चौरंगी लढती होणार आहेत. अलिबाग, रोहा, कर्जत व माथेरान या चार ठिकाणी थेट दुरंगी लढती होणार आहेत. राज्यामध्ये महायुती विरोधात महाआघाडी असे चित्र जरी असले तरी रायगडमध्ये मात्र प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या सोयीनुसार आघाडी केली आहे. जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात बंड केलेले आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी व मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी या लढती प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. नगराध्यक्षपद आपल्याकडेच राहावे यासाठी सर्व पक्ष जोर लावत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी खोपोलीमध्ये शिवसेना, भाजप, आरपीआय युती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.
............
अशी असणार लढत
अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष व महायुतीमध्ये लढत आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन पक्षात प्रमुख लढत असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेदेखील आपले उमेदवार येथे उभे केले आहेत. रोहा व महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. मुरूडमध्ये शिवसेना, शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेस, पेणमध्ये भाजप, काँग्रेस व आम्ही पेंणकर, उरणमध्ये भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी व शिंदे गट, कर्जतमध्ये महायुती व परिवर्तन आघाडी यांच्यात मुख्य लढत असून माथेरानमध्ये शिवसेना व शिवराष्ट्र पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. खोपोली नगरपालिकेमध्ये सात उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे.
.......
नगरपालिका , नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार
खोपोली ७/११८
अलिबाग २/४२
श्रीवर्धन ४/६०
मुरुड ३/५८
रोहा २/ ५१
महाड ५/ ४८
पेण ३/५२
उरण ४/ ४९
कर्जत २/४६
माथेरान २/४६
.....