अयोध्येत आज राम मंदिरात धर्म ध्वजा रोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद दिसले नाहीत. आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं, असा दावा अवधेश प्रसाद यांनी केला आहे. त्यावर त्यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी दलित समाजातील असल्याने मला रामलला दरबारात धर्म ध्वजा स्थापना कार्यक्रमासाठी बोलावलं नाही” असा आरोप अवधेश प्रसाद यांनी केला आहे. “राम सर्वांचा आहे. माझी लढाई कुठलं पद किंवा निमंत्रणाशी नाही. सन्मान, बरोबरी आणि संवैधानिक मर्यादेचा हा विषय आहे” असं अवधेश प्रसाद म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत आले होते. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रोच्चार आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांमध्ये त्यांनी भगवा ध्वज फडकावला. या अनुष्ठानासह मंदिराचं निर्माण औपचारिक दृष्टया पूर्ण झालं. शतकानुशतकाच्या जखमा भरत आहेत. “शतकानुशकताच्या वेदनांना विराम मिळत आहे. अनेक वर्षाचा संकल्प सिद्धीप्राप्त होत आहे. ज्या यज्ञाची अग्नी ५०० वर्ष प्रज्वलीत राहिली, जो यज्ञ एक क्षणही आस्थापासून दूर गेला नाही. एक क्षणही विश्वासापासून दूर गेला नाही, तो यज्ञ आज घडत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सोशल मीडियावर पोस्ट करुन नाराजी
ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. स्थानिक खासदाराला या कार्यक्रमाच निमंत्रण दिलं नाही, या मुद्यावरुन आता राजकारण सुरु झालय. अवधेश प्रसाद अयोध्येचे खासदार आहेत. आपल्याला कार्यक्रमाला बोलावलं जाईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण तसं घडलं नाही. कार्यक्रमानंतर अवधेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन नाराजी व्यक्त केली.
एकदिवस आधी अवधेश प्रसाद काय म्हणालेले?
अवधेश प्रसाद हे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत. एकदिवस आधी 24 नोव्हेंबरला पोस्ट करुन त्यांनी राम मंदिरात धर्म ध्वजा रोहण कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं नाही याची माहिती दिली होती. “मला निमंत्रण आलं, तर हातातली सर्व कामं सोडून लगेच तिथे जाईन” एवढही ते बोलले होते. स्थानिक खासदाराने हे म्हटल्यानंतरही त्यांना कार्यक्रमासाठी बोलावलं नाही.