बॉलीवूडचे ही मॅन सुप्रिसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर गुरूवारी देओल कुटुंबाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. धर्मेंद्र रुग्णालयात असताना, अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. काहींनी त्यांच्या घरीही भेट घेतली, ज्यात शक्तीमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांचाही समावेश होता.
अभिनेते मुकेश खन्ना यांनी धर्मेंद्रसोबतच्या त्याच्या शेवटच्या भेटीची आठवण एका यूट्यूब ब्लॉगमध्ये सांगितली. मुकेश धर्मेंद्र यांनी रुग्णालयातून घरी आणल्यानंतर भेटले होते. यावेळी धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने धर्मेंद्रसाठी घरी आयसीयूसारखी व्यवस्था तयार केली होती. सर्वांना आशा होती की धर्मेंद्र लवकर बरे होतील. मला माहित होते मला धर्मेंद्रजींना जास्त वेळ भेटता येणार नाही. पण तरीही मी मला त्यांना भेटायचे होते. त्यामुळे मी तेथे गेलो होतो, असे ते यावेळी म्हणाले.
मुकेश म्हणाले की, मी सनी आणि बॉबी देओललाही भेटलो. त्यावेळी मी त्यांना सांगितले, धर्मेंद्र खूप धीट आहे. ते यातून बाहेर येतील, ते या आजारावर मात करतील आणि परत येतील. पण शेवटी, देवाची इच्छा असेल तेच होईल. त्याच्या जाण्याबद्दल ऐकून सर्वांना धक्का बसला. कारण लोकांना वाटले होते की ते बरे होतील. पण शेवटी देवाची इच्छा…, असे यावेळी ते म्हणाले.
मुकेश यांनी नंतर ‘तहलका’ या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेल्या काही क्षणांची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांचा साधेपणा आणि नम्रतेचे कौतुक केले. हे दोन्ही गुण धर्मेंद्र यांची सर्वात मोठी ताकद होती. त्यांच्या शेवटच्या महिन्यांत, जेव्हा ते आजारी होते, तेव्हाही त्यांचा चेहरा सकारात्मक होता. या दिग्गज अभिनेत्याचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. 8 डिसेंबरला त्यांचा 90 वा वाढदिवस होता. त्याच्या कुटुंबाने तो मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन केले होते. पण कोणाला माहित होते की हा महान माणूस त्याच्या वाढदिवसापूर्वीच सर्वांना सोडून जाईल? असे ते यावेळी म्हणाले.








